मुंबई : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून नवीन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडा लोकशाही दिनाचे आयोजन करणार आहे.म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील चौथ्या मजल्यावरील सभागृहात सकाळी ११ वाजता म्हाडा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार असून म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. दरम्यान, सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस म्हाडा लोकशाही दिन घेण्यात येईल.
अर्ज कोठे मिळेल?
म्हाडा लोकशाही दिनासाठी अर्ज विहित नमुन्यात असणे आवश्यक असून त्याची माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर आहे.
अर्जदाराची तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे, तसेच अर्जदाराने अर्ज १४ दिवस अगोदर दोन प्रतींत पाठवणे आवश्यक आहे.
नागरिकांना तत्काळ निर्णय देण्यासाठी विषयाशी निगडित संबंधित विभाग, मंडळप्रमुख हजर राहणार आहेत. तसेच नागरिकांकडून प्राप्त अर्जाची पोचपावती दिली जाणार आहे.
अहवाल कोणाला?
लोकशाही दिन झाल्यानंतर त्याच आठवड्यात बैठकीत प्राप्त विषयांचा सविस्तर आढावा अहवाल तयार करून म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात येईल.
कोणते अर्ज स्वीकारणार नाही :
न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व किंवा अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे, अशा प्रकरणाची पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल असे अर्ज म्हाडा लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत.
‘या’ अर्जांचे काय होणार?
जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कारवाईसाठी आठ दिवसांत पाठवण्यात यावे व त्याची प्रत अर्जदारास पृष्ठांकित करणे गरजेचे असणार आहे.