Join us

सर्वसामान्यांसाठी लोकल नव्या वर्षातच होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:24 AM

जनतेचे आराेग्य, सुरक्षेला प्राधान्य : कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी पालिका सज्जलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत ...

जनतेचे आराेग्य, सुरक्षेला प्राधान्य : कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी पालिका सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत कोरोना परिस्थितीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला असला तरी जनतेचे आरोग्य, सुरक्षेच्या कारणासाठी मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी नव्या वर्षातच सुरू हाेईल. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी तूर्तास जनतेच्या आरोग्याच्या, सुरक्षेच्या कारणासाठी लाेकल सुरू करणे योग्य नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.

पालिका आयुक्त चहल यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, कोरोनाचा फैलाव होणार नाही म्हणून गांभीर्याने काळजी घेतली जात आहे. विशेषत: कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून मुंंबई महापालिका युद्धपातळीवर काम करत आहे. गणेशोत्सव, दहीहंडी किंवा त्यापूर्वीचे सण असोत, आपण काळजी घेतली आहे. यापुढेही नाताळ असो किंवा कुठलाही अन्य उत्सव, नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाईल आणि त्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबतचा विचार केला जाईल.

१५ डिसेंबरनंतरच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होण्याची चिन्हे होती. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून तूर्तास लोकल सुरू केली जाणार नाही. कोरोना संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविली जात आहे. चाचणी व पडताळणी करण्यात येत आहे.

* चाचण्यांची संख्या वाढवली - पालिका आयुक्त

दिल्लीच्या तुलनेत मुंबईने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले आहे. गणेशोत्सवानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, तशी परिस्थिती आता निर्माण होऊ नये म्हणून महापालिका सज्ज आहे. काेराेनाच्या चाचण्या वाढवण्यात येत आहेत. तसे काम केले जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने दिवाळीनंतर परराज्यातून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या सुरू केल्या आहेत, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.

.....................................................