सर्वसामान्यांनी दर्शवला आयुर्वेदिक डॉक्टरांना पाठिंबा, सर्वेक्षणातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 03:11 AM2020-12-12T03:11:24+5:302020-12-12T03:11:40+5:30
Ayurvedic doctors : आयुर्वेदिक डॉक्टर आणि आयएमए यांच्यातील वाद देशभरातील डॉक्टरांच्या संपापर्यंत येऊन पोहोचला आहे. या दरम्यान एका सर्वेक्षणदरम्यान लोकांना आयुष डॉक्टरांकडून नमूद शस्त्रक्रिया पार पाडून द्याव्यात का, यावर ४८ टक्के लोकांनी सहमती दर्शविली
मुंबई : आयुर्वेदिक डॉक्टर आणि आयएमए यांच्यातील वाद देशभरातील डॉक्टरांच्या संपापर्यंत येऊन पोहोचला आहे. या दरम्यान एका सर्वेक्षणदरम्यान लोकांना आयुष डॉक्टरांकडून नमूद शस्त्रक्रिया पार पाडून द्याव्यात का, यावर ४८ टक्के लोकांनी सहमती दर्शविली असून, ४२ टक्के लोकांनी विरोध दर्शविला आहे. १० टक्के लोकांनी या बाबती मत दर्शविण्यास नकार दिला.
आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर भारतातील रुग्णांवर स्वतंत्रपणे करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सीसीआयएम (सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन)ने केलेल्या दाव्यानुसार या शस्त्रक्रिया आधुनिक वैद्यकातील (अॅलोपॅथिक) नसून आयुर्वेदिक आहेत.
अॅलोपॅथीमध्ये सर्जन होण्याआधी विविध विषयांचा अभ्यास करावा लागतो. आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकाचे शिक्षण देणे आणि वरवरचे तंत्र शिकवून शस्त्रक्रियेस परवानगी देणे धोक्याचे ठरू शकते, अशी भूमिका आयएमएतर्फे घेण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर लोकल सर्कल या संस्थेकडून २८ हजारांहून लोकांची मते जाणून घेतली. आयुष डॉक्टरांनी शस्त्रक्रिया पार पडल्यास ते कोणत्या प्रकारची औषधे रुग्णांसाठी वापरतील किंवा वापरली जावीत, या प्रश्नावर आयुष डॉक्टरांना सर्वप्रथम शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देऊच नये, असे मत ३५ टक्के लोकांनी मांडले, तर त्यांच्या पद्धतीने त्यांना उपचार करू द्यावेत, अशी भूमिका २७ टक्के लोकांनी मांडली. १९ टक्के लोकांच्या मतानुसार त्यांनी आयुषचीच औषधे वापरावीत, तर १२ टक्के लोकांच्या मतानुसार ॲलोपॅथी औषधे वापरण्यास निर्देश द्यावेत असे सुचविले आहे.
दंत उपचारासाठीही दिली पसंती
लोकांना दातांच्या दुखण्यासाठी किंवा शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी कोणत्या प्रकारच्या डॉक्टरकडे भविष्यात जाल, असा प्रश्न विचारल्यास ७९ टक्के लोकांनी एखाद्या बीडीएस/एमडीएस, ॲलोपॅथिक डॉक्टरांकडेच जाऊ, असे सांगितले, तर केवळ १४ टक्के लोकांनीच आपण आयुष डॉक्टरांचा सल्ला घेऊ किंवा उपचार घेऊ, असे मान्य केले. यावरून आयुष आयुर्वेदिक डॉक्टरांना सर्वसामान्यांकडून पाठिंबा दिला जात असला, तरी उपचारावेळी ते ॲलोपॅथी डॉक्टरांचाच पर्याय निवडताना दिसत असल्याचे सर्वेक्षणावरून स्पष्ट झाले आहे.