दोन महिन्यांच्या प्रदीर्घ बंदमुळे सामान्य व्यापारी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:06 AM2021-05-28T04:06:14+5:302021-05-28T04:06:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन, कठोर निर्बंधांमुळे बाजारपेठांचे मोठे आर्थिक नुकसान झाले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन, कठोर निर्बंधांमुळे बाजारपेठांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषत: एप्रिल महिन्यात लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळे मुंबई शहर आणि उपनगरातील बाजारपेठा काही तासांसाठीच सुरू असल्याने आता झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे कंबरडे मोडले आहे. परिणामी आता मुंबईतल्या कोरोना रुग्णांचा आलेख खाली घसरत असल्याने बाजारपेठांसाठी वेळ वाढवून देण्यात यावी; अशा आशयाचा सूर बाजारपेठांमधून उमटू लागला आहे.
मुंबईच्या दक्षिण भागात म्हणजे मस्जिद बंदर, झवेरी बाजार, ग्रँट रोड, मध्य मुंबईत लालबाग आणि दादर, माटुंगा मार्केट, पूर्व उपनगरात कुर्ला आणि घाटकोपर येथील कपड्यांच्या बाजारपेठा, पश्चिम उपनगरातील वांद्रे आणि अंधेरी येथील मोठ्या बाजारपेठांसह इतर बाजारपेठा सकाळची वेळ वगळता पूर्णत: बंद आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने हाच दिनक्रम सुरू असल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. यात मोठे आणि छोटे असे दोन्ही व्यापारी भरडले गेले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनासंबंधित घोषित निर्बंध १ जून रोजी संपत असून या दिवसापासून सर्वच व्यापार पूर्णवेळ सुरू करण्यासाठी परवानगी मिळालीच पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.
----------------
विशेष पॅकेज द्या
दोन महिन्यांच्या बंद कालावधीतील महापालिका, नगरपालिकांच्या अधिकार क्षेत्रातील दुकानांचे भाडे माफ करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या परवाना फीमध्ये एक वर्षाची माफी द्यावी, प्रॉपर्टी टॅक्स, वीजबिल व कर्जावरील व्याजमाफी यांचा समावेश असलेले विशेष पॅकेज व्यापाऱ्यांसाठी जाहीर करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे.
----------------
लसीकरणासाठी विशेष व्यवस्था
व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश दुकानदारांनी लसीकरण करून घेतले असून उर्वरित व्यापाऱ्यांनीही लवकरात लवकर स्वतःचे व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.