मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीमुळे लांबलेल्या पोलीस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाच्या सर्वसाधारण बदल्या येत्या गुरुवारपर्यंत होणार आहेत. पोलीस मुख्यालयातून त्याबाबतचे आदेश काढण्यात येणार आहेत.प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी रविवारी आपल्या फेसबुक अकाउंटवरून त्याबाबत माहिती दिली आहे. उपाधीक्षक ते वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या मात्र १४ ऑगस्टपूर्वी केल्या जातील, गृह मंत्रालयातून त्याबाबतचे आदेश काढण्यात येणार आहेत. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के बदल्या करण्याबद्दल सामान्य प्रशासन शुक्रवारी अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार ११ बढत्यासह जवळपास ५० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील.राखीव पोलीस दलातील बदल्या सोमवारी तर त्यानंतर दोन दिवसांत हवालदारांना पदोन्नती दिली जाईल. वायरलेस, श्वानपथक, परिवहन विभागातील अंमलदारांच्या विनंतीवरून करण्यात येणार आहे. त्यानंतर नि:शस्त्र दलातील पीएसआय, एपीआय व पीआयच्या बदल्या गुरुवारपर्यंत करणार असल्याचे पांडे यांनी जाहीर केले आहे.
निरीक्षकांच्या प्रमोशनसाठी उद्या बैठकपोलीस निरीक्षकांच्या उपाधीक्षक/ सहायक आयुक्त पदावर पदोन्नतीसाठी येत्या मंगळवारी गृह विभागाची बैठक होणार आहे. या पदाच्या २४० वर पदे रिक्त असले तरी सुमारे २०० जणांना बढती दिली जाणार आहे. संवर्गप्रमाणे नियुक्ती दिली जाणार आहे.