Join us

कोरोना विषाणूमध्ये होत राहणार जनुकीय बदल; टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:05 PM

विषाणूतील जनुकीय बदलांमुळेही राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्ण वाढत असण्याची शक्यता आहे.

मुंबई : कोरोनाच्या तीन लाटांवर नियंत्रण मिळविल्यानंतर राज्यात शनिवारी पुण्यात कोरोनाचे नवे दोन व्हेरियंट सापडले आहेत, शिवाय दुसरीकडे राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोना संसर्गाच्या या स्थितीने घाबरून जाण्याची आवश्यकता नसून प्रक्रियेचा भाग म्हणून कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होत राहणार, अशी माहिती टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. 

राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी याबाबत सांगितले, विषाणूतील जनुकीय बदलांमुळेही राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्ण वाढत असण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वा मृत्यूंचे प्रमाण वाढलेले नसून अत्यंत स्थिर आहे. त्यामुळे या संसर्गाच्या चढ-उतारामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. केवळ अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींनी म्हणजेच सहव्याधीग्रस्त, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गर्भवतींनी अधिक खबरदारी बाळगली पाहिजे. तसेच, मास्कचा वापर, सॅनिटायझेशन. शारीरिक अंतराचे नियम पाळले पाहिजेत.

आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार  ओमायक्रॉनचा बीए ४ आणि बीए ५ सब व्हेरियंट जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. १२ पेक्षा जास्त देशात हा सापडला आहे.  कोरोनाचे हे सब व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आहेत, पण तितके घातक ठरले नाहीत. अचानकपणे रुग्णवाढ होणाऱ्या जिल्ह्यांना वाढत्या संसर्गाविषयी अलर्ट केले आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस