औषधांना दाद न देणाऱ्या क्षयाचे जिनोम सिक्वेन्सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2023 11:27 AM2023-03-26T11:27:54+5:302023-03-26T11:28:13+5:30
हेस्टॅक ॲनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे केईएम रुग्णालयात या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे.
मुंबई : औषधांना दाद न देणाऱ्या म्हणजेच एमडीआर, एक्सडीआर क्षय झालेल्या रुग्णांना अधिक अचूक व परिणामकारक औषधोपचार वेळेच्या वेळी मिळावेत, या उद्देशाने आता क्षयरोगाच्या नमुन्यांचेही ‘जिनोम सिक्वेसिंग’ करण्यात येणार आहे. जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून केईएम रुग्णालयात ‘व्होल जिनोम सिक्वेन्सिंग’ प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे औषधांना न जुमानणाऱ्या रुग्णांना क्षयरोगावर मात करण्यासाठी कोणती औषधे द्यावीत, याचा निर्णय घेणे डॉक्टरांना अधिक सोपे होणार आहे.
‘व्होल जिनोम सिक्वेन्सिंग’ प्रकल्प सार्वजनिक आरोग्य खाते आणि ‘सोसायटी फॉर मुंबई इन्क्युबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल) कौन्सिल’ या पालिकेच्या अखत्यारीतील संस्थांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. तर ‘स्माइल’च्या अंतर्गत नवउद्यमी असणाऱ्या व बिझनेस इन्क्युबेशन सेंटरचा भाग असणाऱ्या मे. हेस्टॅक ॲनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे केईएम रुग्णालयात या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे.
क्षयरोगासाठी योग्य असे औषधोपचार उपलब्ध असूनही त्यावर नियंत्रण मिळविणे, हे विविध कारणांमुळे एक आव्हान ठरत आहे. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे एक किंवा अनेक औषधांना प्रतिसाद न देणारे क्षयरोगाचे जिवाणू निर्माण होतात. त्यापैकी ‘मल्टी ड्रग रेसिस्टंट टीबी’ आणि ‘एक्स्टेन्सिव्हली ड्रग रेसिस्टंट टीबी’ हे क्षयरोगाचे दोन्ही प्रकार आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत. अशा प्रकारच्या क्षयरोगाचा प्रसार होण्याचे मुख्य कारण म्हणजे या प्रकारच्या क्षयरोगाचे निदान होण्यास वेळ लागणे. परिणामी, योग्य उपचार होणारा विलंब टाळता येईल.
-डॉ. वर्षा पुरी, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, क्षयरोग नियंत्रण विभाग
एमडीआर, एक्सडीआर क्षय म्हणजे काय?
एमडीआर, टीडीआर व एक्सडीआर हे क्षयरोगाचे विशिष्ट प्रकार आहेत. डीआर म्हणजे ड्रग रेझिस्टंट म्हणजेच औषधांना प्रतिसाद न देणारा आजार.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार पूर्ण केले नाहीत तर त्याचे रूपांतर ‘एमडीआर’ टीबीमध्ये होते. अशा रुग्णाला दोन वर्षे नियमित औषधे घ्यावी लागतात.
त्यांना टॅनामायसीन इंजेक्शन व रोज चौदा गोळ्या घ्याव्या लागतात. परिणामी, त्यांना उलट्या होतात. त्यांची दृष्टी व श्रवणशक्ती कमी होते. मात्र, नियमित उपचार घेतल्यास हा रुग्ण बरा होतो. अनेक रुग्ण कंटाळून मध्येच उपचार सोडतात. त्यामुळे प्रकृती खालावते आणि तो औषधांना दाद देईनासा होतो. अशा रुग्णाला ‘एक्सडीआर’ टीबी होतो.