देवनार कचराभूमीची भौगोलिक चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 02:26 AM2018-05-12T02:26:48+5:302018-05-12T02:26:48+5:30
देवनार कचराभूमीतील कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे.
मुंबई : देवनार कचराभूमीतील कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे सल्लागार टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स यांच्या सल्ल्यानुसार या कचराभूमीची भौगोलिक चाचणी करण्यात येणार आहे. या भौगोलिक चाचणीसाठी ठेकेदाराची नियुक्ती लवकरच करण्यात येणार आहे.
देवनार कचराभूमीची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे येथील कचºयावर प्रक्रिया तसेच वीजनिर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या कचराभूमीवरील सुमारे १२ हेक्टर जागेवर कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्यापासून वीजनिर्मिती करण्यात येईल. या प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आली असून, ही प्रक्रिया जून २०१८पर्यंत पूर्ण होणार आहे.
या प्रकल्पासाठी नेमलेल्या टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स या सल्लागाराने काही शिफारशी केल्या आहेत. त्यानुसार प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेची भौगोलिक चाचणी अहवाल व भौगोलिक तांत्रिक तपासणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कामासाठी रेणुका कन्सल्टंट्स या ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली असून, ७७ लाख रुपये खर्च येणार आहे.