जॉर्ज फर्नांडिसांचा 'इम्पॅक्ट'; एसटी कामगारांना मिळू लागला 'वीक ऑफ'
By महेश गलांडे | Published: January 29, 2019 05:01 PM2019-01-29T17:01:01+5:302019-01-29T19:16:01+5:30
नांदेडच्या डोंगराळ प्रदेशात फिरत असताना एका पत्रकाराचा फोन आला अन् आमचा जॉर्ज गेल्याची बातमी समजली. कामगारांचा लढा उभारणारा आणि कामगार जगणारा जॉर्ज गेल्याच कळताच त्यांच्या आठवणींनी कंठ दाटून आला.
मुंबई - ज्येष्ठ समाजवादी नेते आणि मुंबईतील कामगारांचा आवाज समजला जाणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाची बातमी समजताच देशभरातील समाजवादी वर्तुळात शोककळा पसरली. क्षणार्धात, साधी रहाणी आणि कामगारांची विचारसरणी जगलेल्या या कामगार नेत्यांच्या आठवणींसोबत अनेक समाजवादी नेते भूतकाळात गेले. सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनीही माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या आठवणी लोकमतशी बोलताना सांगितल्या. त्यामध्ये, एसटी महामंडळातील वाहक चालकांना आठवड्याची सुट्टी मिळवून देणारा कामगार नेता म्हणजे आमचा जॉर्ज असल्याचं ते म्हणाले.
नांदेडच्या डोंगराळ प्रदेशात फिरत असताना एका पत्रकाराचा फोन आला अन् आमचा जॉर्ज गेल्याची बातमी समजली. कामगारांचा लढा उभारणारा आणि कामगार जगणारा जॉर्ज गेल्याच कळताच त्यांच्या आठवणींनी कंठ दाटून आला. तेव्हा समाजवादी पक्ष पुरस्कृत महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचा मी अध्यक्ष आणि ते कार्याध्यक्ष होते. मोहन धारिया यांनी काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी त्या संघटनेची सुरूवात केलती. मग, भाऊ पाचाळ संघटनेत सक्रिय झाले होते. 1969 सालच्या बॉम्बे इंडस्ट्रीय इंडस्ट्रीयल अॅक्टनुसार मान्यताप्राप्त संघटनेलाच कामगारांच्या संपात वाटाघाटी करण्याचा अधिकार होता. त्यानुसार काँग्रेसप्रणीत इंटक संघटनेला संपावेळी वाटाघाटी करण्याचा अधिकार होता. मात्र, कामगारांचा पाठिंबा आमच्या संघटनेला होता. त्यामुळे आम्ही संपातील कामगारांचा लढ उभारला होता.
त्यावेळी, एसटीमधील कामगार वाहक-चालक यांना आठवड्याची सुट्टी मिळत नसत. मग, त्यांना आठवड्याची सुट्टी द्यायची असेल तर 1/6 कामगारांची भरती करणे गरजेचं होतं. त्यामुळे एसटीतील कामगारांची संख्या वाढवा आणि वाहक-चालक कामगारांना आठवड्यात एक दिवसाची सुट्टी द्या. तसेच दिवस-दिवस गावाबाहेर राहणाऱ्या चालक-वाहक यांना प्रवास भत्ता आणि जेवण भत्ता देण्यात यावा. म्हणजे रुलींग अलाऊंस भेटावा या प्रमुख मागण्या आम्ही संपातून केल्या होत्या. तब्बल सात दिवस हा संप चालला, अनेकजणांना यावेळी तुरुंगात ठेवण्यात आल होतं. फर्नांडिस हे त्यावेळी मुंबईत होते. आमचे देवेंद्र प्रधान विधानपरिषदेत होते. त्यांनी कामगारमंत्री नरेंद्र शेट्टी यांच्याशी संपर्क करुन यावर तोडगा काढण्याचं सूचवलं. नरेंद्र शेट्टी हे कामगार चळवळीचे नेते होते, त्यांनी तत्कालीन परिवहन मंत्र्यांशी बोलणी करून कामगारांचा हा प्रश्न मार्गी लावला. त्यामध्ये जॉर्जची महत्त्वाची भूमिका होती, अशी आठवण पन्नालाल सुराणा यांनी लोकमतशी बोलताना सांगितली.
जॉर्ज यांच्या सोलापूर आणि विशेषत: बार्शी दौऱ्याची आठवणही पन्नालाल यांनी लोकमतशी बोलताना सांगितली. जॉर्ज हे संयुक्त समाजवादी पक्षाच्या कार्यक्रमासाठी सोलापुरात आले होते. त्यावेळी सोलापूरची सभा संपवून आम्ही त्यांना बार्शीत घेऊन आलो. दोन-तीन दिवसांपूर्वीच कोयनेचा भूंकप झालेला होता. त्यामुळे बार्शीतील त्या सभेवरही भूकंपाच्या घटनेचा दुखवटा होताच. मग, बार्शीच्या पांडे चौकातील सभा रात्री 10 ते 12 वाजता संपवून आम्ही जॉर्जला सोडायला गेलो. त्यावेळी, आमच्याकडे चारचाकी गाडीही नव्हती. त्यामुळे बार्शी-कुर्डवाडी लाईट रेल्वेनं आम्ही जॉर्जला सोडायला कुर्डूवाडीत गेलो. बार्शी-कुर्डूवाडी नॅरो गेज रेल्वेनं आम्ही रात्री बारा वाजता कुर्डूवाडीला गेलो. कुर्डूवाडीवरुन गाडी बदलून आम्ही पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर तिथून भूकंपग्रस्त कोयना परसराला भेट दिली. त्या भागातील कामगार आणि शेतकऱ्यांना भेटलो, त्यांचे प्रश्न जॉर्जने समजावून घेतले आणि त्यानंतर जॉर्ज मुंबईला निघून गेला.
पन्नालाल हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातील आसू या गावचे असून सोलापूरसह महाराष्ट्राच्या राजकारणात ज्येष्ठ समाजवादी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. जॉर्ज यांच्यासमवेत त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध होते. सर्वप्रथम वयाच्या 31 व्या वर्षी ते मुंबईतील काळा घोडा चौकातील संभेनंतर जॉर्ज यांना भेटले होते. त्यानंतर, एकत्र काम करताना आम्हा दोघांमध्ये चांगली मैत्री जमल्याचं त्यांनी सांगितले. तर, संरक्षणमंत्री असताना उदगीरला ते सभेसाठी आले होते, त्यावेळी त्यांची भेट भेट झाली होती. गेल्या 13 वर्षांपासून ते दुर्धर आजाराशी खिळून होते. मध्यंतरी त्यांना भेटायला जायचा प्रयत्न केला, पण त्यांना भेटू दिलं जात नसतं. त्यामुळे उदगीरच्या सभेतील त्यांची भेट ही अखेरची भेट ठरल्याचं पन्नालाल सुराणा यांनी सांगितलं. तर, जॉर्ज हा साधी राहणी अन् कामगार विचारसरणी असलेला नेता होता, त्याच्या वागण्या बोलण्यात कधीही मोठेपणा नव्हता. जॉर्ज मला माहितीय तसं तो स्वत:चे कपडे स्वत:च धुवायचा. तर, कामगारांबद्दल प्रचंड आस्था असलेला असा हा कामगार नेता होता. जॉर्जच्या जाण्यानं कामगार चवळीचं वादळ शांत झाल्याची भावना पन्नालाल सुराणा यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.