जगात जर्मनी, भारतात परभणी... लसीच्या परवानगीची घोषणा करणारा 'आपला माणूस'
By महेश गलांडे | Published: January 3, 2021 12:57 PM2021-01-03T12:57:59+5:302021-01-03T12:59:42+5:30
जगात जर्मनी, भारतात परभणी.. ही म्हण तुम्ही ऐकली किंवा वाचली असेलच. या म्हणीचा प्रत्यय आज देशवाशीयांना आला. मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यातील भूमीपुत्राने देशात दोन लसींना परवानगी देण्यात आल्याची घोषणा केली.
मुंबई - गेल्या कित्येक महिन्यांपासून देशातील नागरिक ज्या कोरोना लसीच्या बातमीकडे डोळे आणि कान लावून बसले होते, ती कोरोना लस आता बाजारात उपलब्ध होणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. देशात कोरोना लसीच्या परवानगीची आनंदी बातमी मराठमोळ्या डॉक्टरने अधिकृतपणे सांगितली, देशवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
जगात जर्मनी, भारतात परभणी.. ही म्हण तुम्ही ऐकली किंवा वाचली असेलच. या म्हणीचा प्रत्यय आज देशवाशीयांना आला. मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यातील भूमीपुत्राने देशात दोन लसींना परवानगी देण्यात आल्याची घोषणा केली. गेल्या वर्षभरापासून चिंताग्रस्त असलेल्या देशवासीयांच्या जीव या घोषणेनं भांड्यात पडला. वेणूगोपाळ सोमानी हे मूळचे परभणीचे असून सध्या ते DCGI चे संचालक बनून दिल्लीत कार्यरत आहेत.
Vaccines of Serum Institue of India and Bharat Biotech are granted permission for restricted use in emergency situation: DCGI pic.twitter.com/fuIfPQ9i7B
— ANI (@ANI) January 3, 2021
वेणूगोपाळ याचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणही परभणी जिल्ह्यातच झालं. पुढे त्यांनी उच्च शिक्षण M. Pharm आणि Ph. D नागपूर विद्यापीठातून पूर्ण केलं. काही कालावधीनंतर Central Drugs Standard Control Organisation सोबत काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ड्रग्स इन्स्पेक्टर म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास 2019 पर्यंत DCGI (Drugs Controller General of India) पदापर्यंतत पोहोचला. डॉ. व्ही. जे सोमानी यांनी मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली अशा ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर यशस्वी कामगिरी केली आहे. डॉ. सोमानी सध्या धोरण तयार करणं, प्रशिक्षण, निवड प्रक्रिया, नियामक प्रक्रियेसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत.
शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)च्या कोरोनावरच्या तज्ज्ञ समितीने मान्यता दिली होती. त्यानंतर आता डीसीजीआयकडून परवानगी मिळाली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या या दोन्ही लसी 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवण्यात येऊ शकतात, असे डीसीजीआयने म्हटले आहे. तसेच, थोडा ताप, वेदना आणि अलर्जी असे परिणाम प्रत्येक लसींमध्ये असतात. या दोन्ही लसी ११० टक्के सुरक्षित आहेत, असे व्हीजी सोमाणी यांनी म्हटले आहे.