मुंबई - कोरोना व्हायरससंदर्भात विधानसभा सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन सादर केले. खबरदारी आणि दक्षता घेत असल्याचं सांगत त्यांनी महानगरातील काही संस्था बंद ठेवण्यात येत असल्याचे सांगितले. या निवदेनानंतर भाजपा नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी समर्थन करत काही सूचना केल्या. या सूचनांवरही विचार विनियम सुरू असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच, खबरदारी आणि जनजागृती महत्वाची असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.
विदर्भातील 17 विद्यार्थी फिलिपाईन्समध्ये अडकले आहेत. तेथील सरकारने शहर सील करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, या मुलांचे पालक चिंताग्रस्त आहेत. या मुलांना आणि त्यांच्या पालकांना नेमकं कुठं जावं, काय करावं? हे समजत नाही. त्यामुळे सरकारने आपत्ती कक्ष उभारावे अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच, सॅनिटायझर्सची अनुपब्लधता ही गंभीर बाब असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात काही डॉक्टरांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. न शिकता डॉक्टर झालेले मार्गदर्शन करत आहेत. गरम पाण्याने जंतू मरतात. गरम पाणी प्या.. असं ते सांगत आहेत. त्यामुळे, सरकारने अधिकृतपणे यासंदर्भातील माहिती तज्ञ सरकारी डॉक्टर्स आणि आरोग्यमंत्री यांच्या माध्यमातून शेअर करावी. सावधानी म्हणजे काय, ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. माहिती व जनसंपर्क विभागामार्फत अधिकृत माहिती देणाऱ्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल केल्या पाहिजे, असेही ते म्हणाले.
आपण योग्य ती खबरदारी न घेतल्यास, 17 चे 17 हजार व्हायला वेळ लागणार नाही. अनेक सार्वजनिक ठिकाणच्या जागांवर जाणं आपण टाळू शकत नाहीत. त्यामुळे आत्ताच हे थांबवलं पाहिजे, नंतर उपचार करण्याच्यावेळी ते डिजास्टर होणार नाही. आपल्याकडे काय डिजास्टर मॅनेजमेंट वगैरे नाही, ते देवाच्या, ते 33 कोटी देवच पाहतील, ते कर्मचारी पाहू शकत नाहीत. त्यामुळे खबरदारी हाच उपाय असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाचं महत्व म्हणजेही खबरदारी हेच आहे. जिल्हा स्तरावर कक्ष स्थापन करणे आवश्यक आहे, तसेच जनजागृतीही महत्वाची आहे.