मुंबई : पे्रयसीवर अॅसिड हल्ला करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करणारा चित्रपट व्यावसायिक जेरिट जॉनविरुद्धच्या खटल्यावरील निर्णय विशेष महिला न्यायालयाने ६ आॅक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे. विवाह करण्यास नकार दिल्याने जेरिट जॉनने त्याच्या माजी प्रेयसीवर अॅसिड हल्ला केला. पोलिसांनी त्याला काहीच दिवसांत अटक केली. २०१२मध्ये जेरिटने फिजीओथेरीपिस्ट आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटू आर्यांका होस्बेतकर हिच्यावर तिच्या वरळी येथील घराबाहेर अॅसिड हल्ला केला. सुरुवातीला त्याच्यावर गंभीर दुखापत केल्याबद्दल, जबरदस्तीने घुसल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर आर्यांकाने जेरिटचा आपली हत्या करण्याचा विचार होता, असे पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला. जेरिट पत्नीला घटस्फोट देण्यास तयार असूनही आर्यांका त्याच्याशी विवाह करण्यास तयार नव्हती. त्यामुळेच जेरीटने तिच्यावर अॅसिड हल्ला केला. या खटल्यातून मुक्त करण्यात यावे, यासाठी जेरिटने खटल्यादरम्यान विशेष महिला न्यायालयापुढे अर्ज केला. पोलिसांनी त्यावर आक्षेप घेतला. जेरिटने दोनदा आर्यांकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्याचा हा अर्ज फेटाळला. त्यावर जेरिटने विशेष न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र उच्च न्यायालयानेही त्याला दिलासा देण्यास नकार दिला.
जेरिट जॉनचा ‘फैसला’ ६ आॅक्टोबरला
By admin | Published: October 03, 2015 3:00 AM