मुंबई : थंडीने जगभर हुडहुडी उडाली असतानाच, देशासह राज्यातही कमालीची थंडी पडली आहे. दिल्लीचे किमान तापमान मंगळवारी ४.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असतानाच, राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मुंबईचे किमान तापमान १६.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, सोमवारच्या तुलनेत मंगळवारी किमान तापमानात ३ अंशांनी वाढ झाली आहे. सोमवारी मुंबईचे किमान तापमान १३ अंश नोंदविण्यात आले होते.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर कोकण-गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. १० ते १३ जानेवारी दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. बुधवारसह गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंशाच्या आसपास राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.दरम्यान, मागील आठवड्याभरापासून मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या थंडीने मुंबईकरांना हुडहुडी भरली आहे. किमान तापमान १३ ते १६ अंशादरम्यान नोंदविण्यात येत आहे. शिवाय दिवसासह रात्री वाहणारे गार वारे थंडीत भर घालत आहेत. एकंदर किमान तापमानात काही अंशी वाढ झाली असली, तरी गारवा कायम असून, पुढील पाच दिवस हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबईत गारवा कायम, तापमानात किंचित घट; राज्यातील सर्वाधिक कमी ९ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 1:05 AM