तर मिळेल २४ तास पाणी

By admin | Published: July 4, 2015 11:33 PM2015-07-04T23:33:22+5:302015-07-04T23:33:22+5:30

ठाणेकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार, वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्यासाठी केंद्र शासनाच्या नव्या अमृत योजनेत सहभागी

Get 24 hours water | तर मिळेल २४ तास पाणी

तर मिळेल २४ तास पाणी

Next

अजित मांडके ल्ल ठाणे
ठाणेकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार, वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्यासाठी केंद्र शासनाच्या नव्या अमृत योजनेत सहभागी होऊन या कामाला गती देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पूर्वी केवळ मुंब्रा आणि घोडबंदरपुरती मर्यादित असलेली रिमॉडेलिंगची योजना आता संपूर्ण ठाण्यासाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे. या योजनेला केंद्राने मंजुरी दिली तर ठाणेकरांना येत्या काही काळात २४ तास पाणी मिळणार आहे.
तत्कालीन सरकारच्या काळात जेएनएनयूआरएमअंतर्गत ठाणे महापालिकेने मुंब्रा आणि घोडबंदरसाठी ही योजना हाती घेतली होती. यामध्ये वाढीव पाणीपुरवठा, जलकुंभ, संप-पंपहाऊस उभारणे, जलवाहिन्या नव्याने टाकणे आदी कामांचा समावेश आहे. मुंब्य्रात या कामांतर्गत १३ आणि घोडबंदर भागात तब्बल २७ जलकुंभ उभारले जाणार आहेत. मुंब्य्रात या कामासाठी १२६ कोटींचा तर घोडबंदरसाठी या कामासाठी ३०१ कोटींचा खर्च केला जाणार आहे. ईस्ट झोेनमध्ये मुंब्रा आणि दिवा या भागांचा, तर नॉर्थ झोनमध्ये संपूर्ण घोडबंदर, वर्तकनगर, माजिवडा या भागांचा समावेश होता. परंतु, जेएनएनयूआरएमची योजनाच बंद झाल्याने पालिकेचे हे दोनही महत्त्वाचे प्रस्ताव कागदावरच राहिले होते.
आता नव्या सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेच्या अमृत योजनेत सहभागी होण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, आता त्यांनी पुन्हा हे दोन प्रस्ताव नव्याने तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, ते सादर करताना त्यांनी ठाणे शहराचा भागही त्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असून नॉर्थ (घोडबंदर), ईस्ट (मुंब्रा -दिवा) आणि सेंट्रल (ठाणे शहर) असा एकत्रित नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. सेंट्रलसाठी १६७ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. सेंट्रलमध्ये १० जलकुंभ उभारण्यात येणार असून यात ठाणे शहर, रायलादेवी, वागळे, कोपरी, नौपाडा, उथळसर आणि कळवा या भागांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेच्या धर्तीवर ही योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी लोकमतशी बोलताना दिली.

शहरात
पाणीगळती
४५ टक्के...
पाणीगळतीचे प्रमाण हे ४५ टक्क्यापर्यंत असल्याचे पालिकेने मान्य केले आहे. त्यामुळे ते रोखण्यावर भर दिला जाणार आहे. हे पाणी वाया जात नसून ते पाणी कोणीतरी वापरत आहे. परंतु, त्याचे बिल मात्र पालिकेला मिळत नाही. त्यामुळेच आता या गळतीला चाप लावण्याचा पालिकेचा मानस आहे.

२०२१ च्या लोकसंख्येला ६०० एमएलडी पाण्याची गरज...
२०२१ ची लोकसंख्या लक्षात घेता त्या वेळेस शहराला साधारणपणे ६०० दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासणार आहे. त्यानुसार, सध्या शहराला मिळणाऱ्या ४७२ एमएलडीपैकी बीएमसी- ६०, स्टेम- १२०, एमआयडीसी- १०० आणि पालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २०० एमएलडीचा पाणीपुरवठा शहराला होत आहे. परंतु, केवळ नियोजन आणि वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने काही भागांना आजही अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळेच वितरण आणि नियोजन व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला जाणार आहे.


शाई धरणासाठी प्रयत्न...
२०२१ ची लोकसंख्या लक्षात घेता आणि ठाणेकरांना आणखी पाणी मिळणे शक्य नसल्याने पालिकेने शाई धरणासाठी पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. हे धरण बांधण्यासाठी पालिका पुन्हा शासनाकडे पत्रव्यवहार करणार असून सुरुवातीला त्याचा खर्च हा ८५० कोटींच्या आसपास होता. त्या वेळेस एमएमआरडीएने हे धरण बांधण्यास नकार दिल्याने पालिकेने हा प्रकल्प दप्तरी दाखल केला होता. परंतु, आता ठाणेकरांना २४ तास पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने पालिका पुन्हा हे धरण उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून आता याचा खर्च २२०० कोटींच्या घरात जाणार आहे. परंतु, ते एमएमआरडीएनेच उभारावे, असाच आग्रह धरला जाणार आहे.

प्रत्येक कनेक्शनवर मीटर बसविणार...
ठाणे शहरात आजघडीला घरगुती १ लाख ३० हजार आणि वाणिज्य वापराची ५७०० कनेक्शन आहेत. यातील काही वाणिज्य वापराच्या नळांना मीटर बसविले आहेत. विशेष म्हणजे मीटर बसविण्यासाठी अनेक वेळा निविदा काढल्या आहेत. परंतु, त्याला अपेक्षित यश आलेले नाही. आता पुन्हा प्रत्येक कनेक्शनला मीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पाणी वापर, चोरी व वसुलीवर नियंत्रण ठेवता येईल.

Web Title: Get 24 hours water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.