Join us

जूनपर्यंत घ्या आयडॉलमध्ये प्रवेश..! जुलैपासून सुरू होणाऱ्या पदवी व पदव्युत्तरसाठी प्रवेश सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 2:12 PM

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या, मात्र नोकरी आणि अन्य कारणांमुळे हे शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचा मोठा आधार आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) जुलै सत्राच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या, मात्र नोकरी आणि अन्य कारणांमुळे हे शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचा मोठा आधार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली नोकरी करून दूर व मुक्त पद्धतीने शिक्षण पूर्ण करता येते. याचा लाभ अनेकांना होत असून, गेल्यावर्षी आयडॉलमध्ये २१ अभ्यासक्रमांसाठी ५८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. आता विद्यापीठाने यंदाची आयडॉलची जुलै सत्राची प्रवेश प्रक्रिया १९ मे पासून सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेश अर्ज सादर करता येतील. हे प्रवेश ऑनलाईन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरता येतील, अशी माहिती आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली.

तीन नवीन अभ्यासक्रम-  विद्यापीठ अनुदान आयोगाने आयडॉलला यावर्षीपासून तीन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. -  त्यामध्ये एम.ए.-मानसशास्र, एम.ए. (संज्ञापन आणि पत्रकारिता), एम.ए. (जनसंपर्क) हे तीन अभ्यासक्रम आहेत. -  या अभ्यासक्रमांच्या प्रवेशालाही सुरुवात झाली आहे. -  यातील एम.ए. मानसशास्त्र या अभ्यासक्रमासाठी पात्रता ही बीए मानसशास्त्र असेल. -  तर एम.ए. संज्ञापन व पत्रकारिता आणि एम.ए. जनसंपर्क या अभ्यासक्रमांकरिता कोणत्याही शाखेच्या पदवीधारकांना प्रवेश दिला जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

 एमबीए, एमसीए  अभ्यासक्रम लवकरच ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) या शिखर संस्थेने आयडॉलमध्ये एमएमएस-एमबीए आणि एमसीए हे अभ्यासक्रम दूरस्थ माध्यमातून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे एमएमएस-एमबीए आणि एमसीएसाठी लवकरच प्रवेश परीक्षा घेतली जाईल. यूजीसीची मान्यता मिळाल्यानंतर या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरूयामध्ये पदवीस्तरावरील प्रथम वर्ष बीए, बी. कॉम., बी. कॉम. अकाउंट्स अँड फायनान्स, बी.एस्सी. आयटी, बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील प्रथम वर्ष एम.ए. (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी), एम.ए. शिक्षणशास्त्र, एम.ए. - मानसशास्त्र, एमए (संज्ञापन आणि पत्रकारिता), एम.ए. (जनसंपर्क), एम. कॉम., एम.एस्सी. गणित, एम.एस्सी. आयटी, एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे.

 

टॅग्स :मुंबईमुंबई विद्यापीठशिक्षण