Join us

मोबाईलवरून काढा " बेस्ट " तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:09 AM

मुंबई : मोबाईल ॲपवरून तिकीट काढण्याची सुविधा बेस्ट प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही ...

मुंबई : मोबाईल ॲपवरून तिकीट काढण्याची सुविधा बेस्ट प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिकीट काढताना सुट्ट्या पैशांवरून होणारा वाद टळणार आहे.

गेल्यावर्षी बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून दररोज सरासरी ३५ लाख प्रवासी प्रवास करत होते. मात्र, कोविड काळात टाळेबंदी करण्यात आल्याने प्रवाशी संख्येत मोठी घट झाली. आता शहरातील सर्व व्यवहार पुन्हा सुरू झाल्यामुळे दररोजची प्रवाशी संख्या २५ लाखांवर पोहोचली आहे. दररोज प्रवास करणारे प्रवाशी मासिक पास घेतात. तर बेस्ट वाहकाकडून बसमध्ये तिकीट मिळते.

मात्र, प्रवाशांनी भरलेल्या बसगाडीमध्ये प्रत्येक प्रवाशापर्यंत पोहोचून तिकीट देणे वाहकासाठी डोकेदुखीचे ठरते. तसेच अनेकवेळा सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि बसवाहकांमध्ये खटके उडतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दररोजचा रोख व्यवहार टाळण्यासाठी नवीन मोबाईल ॲप तिकीट सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.

अशी आहे ॲपवरील सुविधा

ॲपवरील तिकीट किती तासांसाठीच वैध राहील, याचा कालावधी निश्चित करण्यात येणार आहे तसेच ॲपवरून पास काढणेही शक्य आहे. तिकीट आणि पासचे शुल्क ॲपमध्ये असणार आहे. ॲपवरील तिकीट, पास वाहकाने विचारल्यावर दाखवावे अपेक्षित आहे.

असा होता यापूर्वीचा प्रवास ॲप

सप्टेंबर २०१९ मध्ये बेस्ट ‘प्रवास ॲप’ सुरू करण्यात आला. त्याद्वारे बसगाड्यांची सद्य:स्थिती कळत आहे तसेच थांब्यावर बस किती वेळात येईल, कोणती बस नेमक्या कोणत्या मार्गावर आहे? आदी माहिती उपलब्ध आहे. या प्रवास ॲपमधील सुविधेची लिंक नवीन मोबाईल तिकीट ॲपशी जोडली जाणार आहे. या लिंकद्वारे प्रवासी ॲपमध्ये जाऊन प्रवाशांना बसगाड्याची सद्य:स्थितीही जाणून घेऊन त्याद्वारे तिकीट काढता येणार आहे.