सोन्याच्या दागिन्यांची बॅग मिळाली परत
By admin | Published: April 5, 2015 12:14 AM2015-04-05T00:14:58+5:302015-04-05T00:14:58+5:30
भांडुपमधील महिला वीस तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग रिक्षातच विसरली आणि तिला लगीनघाई भलतीच महागात पडली.
मनीषा म्हात्रे ल्ल मुंबई
शहरात होणाऱ्या घरफोड्यांच्या धास्तीने सारे दागिने सोबत घेत कोकणातील गावाकडे निघालेली भांडुपमधील महिला वीस तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग रिक्षातच विसरली आणि तिला लगीनघाई भलतीच महागात पडली. त्या महिलेचा शोध घेत सारे दागिने सहीसलामत तिच्या स्वाधीन करीत प्रामाणिकपणाची प्रचिती देणाऱ्या किशोर तांबे या रिक्षाचालकाचे सध्या कौतुक होत आहे.
मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या रहिवासी असलेल्या सुनीता राणे (नाव बदलले आहे) भांडुप पूर्वेकडील भांडुप गाव येथे राहतात. बंद घरे फोडून होणाऱ्या घरफोड्यांच्या वाढत्या घटना चॅनेल आणि वर्तमानपत्रांतून वाचल्याने त्या धास्तावल्या होत्या. गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्वत:चे सर्व दागिने आणि रोख रक्कम घेऊन त्या लग्नासाठी गावी निघाल्या. बस चुकू नये म्हणून घाईघाईत शिवाजी तलाव येथे जाण्यासाठी भांडुप स्टेशन येथे रिक्षा पकडली. बसमध्ये चढण्याच्या घाईत दागिन्यांची बॅग त्या रिक्षातच विसरल्या. आपल्या रिक्षामध्ये दागिन्यांची बॅग असल्याची कल्पना रिक्षाचालक किशोर तांबे यालाही नसल्याने दुसरे भाडे घेऊन तो पुढे निघाला. चार तास रिक्षामध्येच ही दागिन्यांची बॅग घेऊन फिरल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास रिक्षाची सफाई करताना तांबेचे बॅगेकडे लक्ष गेले. त्याने बॅग उघडून पाहिली असता त्यात सोन्याच्या दागिन्यांबरोबर रक्कमही आढळली. त्याने तत्काळ हे दागिने घरी नेऊन संबंधितांच्या शोधासाठी बाहेर धाव घेतली. दरम्यान, रिक्षा युनियनच्या फलकावर एका प्रवासी महिलेची दागिन्यांची बॅग हरविल्याचे त्याला कळले. त्याने तत्काळ फलकावरील त्या महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधून पोलिसांनाही त्याबाबत कळविले. ही बॅग सुनीता राणे यांची असल्याची खात्री पटताच त्यांचे दागिने त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.