आरोग्याचे धडे गिरवू...
By admin | Published: January 5, 2017 06:30 AM2017-01-05T06:30:31+5:302017-01-05T06:30:31+5:30
थर्टीफर्स्ट पार्टी, न्यू इयर सेलिब्रेशन म्हणजे मजा, मस्ती आणि फूड. त्यामुळे नवीन वर्षाचे दणक्यात स्वागत करताना, पथ्ये, डाएट, रूटीन या सगळ््याच गोष्टींचा विसर पडला होता
-डॉ. अनिल पाचणेकर
थर्टीफर्स्ट पार्टी, न्यू इयर सेलिब्रेशन म्हणजे मजा, मस्ती आणि फूड. त्यामुळे नवीन वर्षाचे दणक्यात स्वागत करताना, पथ्ये, डाएट, रूटीन या सगळ््याच गोष्टींचा विसर पडला होता, पण आता पुन्हा एकदा दैनंदिन आयुष्य सुरू झाल्यावर, सर्वच मजा आठवायला लागली असेल ना. बरोबर आहे, नवीन वर्षांच्या संकल्पात आरोग्य, व्यायाम, वजन कमी करणे, लवकर उठणे, लवकर झोपणे आणि अशा अनेक गोष्टींची नेहमीच सरशी लागते. त्यामुळे आता या सगळ््या गोष्टी आठवून टेन्शन घेण्याआधी दोन मिनिट शांत बसा आणि मनाशी पक्के करा. हे वर्ष आरोग्यदायी घालवण्यासाठी विचार करा आणि कृतीही करा.
जानेवारी महिन्यातही वातावरणात गारवा राहणार आहे. थंडी वाढल्याने भूक जास्त लागते. त्यामुळे डाएट, वजन कमी करणे या गोष्टींवर आपोआपच मात होते, पण हे सहज टाळता येऊ शकते. थर्टीफर्स्ट पार्टीमध्ये चमचमीत, चटकदार, मसालेदार पदार्थांसह थंडपेय घेतली असतील. आता मात्र, या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेच.
सर्वात पहिल्यांदा खाण्याचे नियोजन करा. थंडीत भूक जास्त लागते, त्यामुळे भूक लागली, तरी मुद्दामहून उपाशी राहू नका. त्यापेक्षा थोड्या-थोड्या वेळाने सकस घरचा आहार घ्या. जंक फूड, पॅक फूड, तळलेले पदार्थ खाणे टाळा.
सकाळी लवकर उठा. चालायला जा. दिवसभरात खूप कामे असली, तरीही थोडा वेळ व्यायामासाठी राखीव ठेवा. वजन कमी असेल, तर थकवा कमी येतो आणि उत्साह वाढतो. सडपातळ शरीर असल्यास हालचाल अधिक सहजरीत्या करता येते. त्यामुळे कार्यक्षमता वाढते. डाळी, पालेभाज्या अधिक प्रमाणात खाव्यात. त्याच वेळी गोड पदार्थ, साखर अधिक प्रमाणात घेणे टाळावे. वजन कमी झाल्यास सांधेदुखी, थकवा असा त्रास जाणवत नाही. शरीराप्रमाणेच मन उत्साही राहणे आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे मानसिक ताण वाढतो. मन आनंदी ठेवायचे असल्यास स्वत:चा छंद जपा. गाणे गा, नृत्य करा, फिरायला जा, सायकलिंग करा, पुस्तके वाचा, तुम्हाला जे आवडते ते करा आणि आनंद लुटा. या छंदांमुळे तुम्हाला नक्कीच मनाला उभारी मिळेल आणि आरोग्यदायी आनंदी आयुष्य जगू शकाल. सर्वांनी आरोग्यदायी वर्षाचा संकल्प करुया...
(लेखक फॅमिली फिजिशियन आहेत.)