नागरिकांत कोरोनाभान आणण्यासाठी लोककलावंतांची मदत घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:08 AM2021-04-30T04:08:03+5:302021-04-30T04:08:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लोककलावंताच्या शब्दांत इतकी ताकद असते की तो लाखोंच्या जनसमुदायाचे मत एका क्षणात परावर्तित करू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोककलावंताच्या शब्दांत इतकी ताकद असते की तो लाखोंच्या जनसमुदायाचे मत एका क्षणात परावर्तित करू शकतो. कोरोनाविरोधातील लढ्यात त्यांना सामील करून घेतल्यास तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून कोरोनाबाबत जागृतीची धार तीव्र करता येईल. या माध्यमातून कलाकारांनाही रोजगार मिळेल आणि त्यांच्या कुटुंबाची उपासमार टळेल, अशी मागणी नंदेश उमप यांनी केली आहे.
कोरोनाकाळात लोककलावंत देशोधडीला लागला आहे. ३००-४०० रुपये मानधनावर काम करणाऱ्या कलाकारांचा रोजगार बंद झाल्याने त्यांची अक्षरशः उपासमार सुरू आहे. अनेक जण मानसिक तणावाखाली असल्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. या संकटकाळात लोककलेला राजाश्रय न मिळाल्यास त्यावर अवलंबून असलेल्यांची अन्नान दशा होईल. त्यामुळे शासनाने प्रत्येक लोककलावंताच्या खात्यात किमान २ ते ३ हजार रुपये जमा करावेत; तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या धर्तीवर लोककलावंतांसाठी संस्था स्थापन करावी, अशी मागणी उमप यांनी केली.
छत्रपती शिवरायांच्या काळापासून लोककलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राची मशाल तेवत ठेवली. १९४२ चा लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान सर्वसामान्यांत स्फूर्ती जागृत केली. आता कोरोनाविरोधातील लढ्यात लोककलावंतांचा वापर हत्यारासारखा केला तरी आम्ही हसतमुखाने तयार होऊ, असे नंदेश उमप यांनी सांगितले.
* मागणी काय?
ग्रामीण भागात पुरेशी जनजागृती न झाल्याने कोरोना प्रसाराचा वेग वाढत आहे. हे संकट रोखायचे असल्यास लोककलावंतांची मदत घेऊन गावोगावी जनजागृती करण्यावर भर द्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कलाकार शासनाचे काम करतील. चौक, नाके, पाडे, वस्त्या, गल्लीबोळांत जाऊन शासनाच्या त्रिसूत्रीचा प्रसार करता येईल. या माध्यमातून कलाकारांना मानधन मिळून त्यांची उपासमार टळेल, असे उमप यांनी म्हटले आहे.
--------------------------