मुंबई : मुंबई विद्यापीठाची विद्यार्थिसंख्या जास्त आहे. निकाल वेळेत जाहीर करणे, परीक्षेचे नियोजन याबाबत कालबद्ध पद्धतीने नियोजन करावे, यासाठी खासगी कंपन्यांची मदत लागली तर त्याबाबतही आराखडा तयार करावा. परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर करावेत; तसेच प्राध्यापक भरती प्रक्रियेला गती देऊन तातडीने याबाबत जाहिरात प्रसिद्ध करावी, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
मंत्रालयात मंगळवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठातील विविध अडचणींसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू अजय भामरे, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठ नामांकित विद्यापीठ आहे. या विद्यापीठाकडून विद्यार्थिहितासाठी उत्तम शैक्षणिक सुविधांसह गुणवत्ता आणि दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. बैठकीत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अडचणी, विद्यार्थी डेटा डॅशबोर्ड, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आता विद्यापीठातही ‘खासगीकरण’
मागील काही दिवसांपासून राज्य शासनाकडून शिक्षण क्षेत्राविषयी घेण्यात येणाऱ्या निर्णयांबाबत शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता मुंबई विद्यापीठातही प्रलंबित निकाल आणि परीक्षांच्या नियोजनाविषयी कामे पूर्ण होत नसतील तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी खासगी कंपन्यांची मदत घेण्याचे सूचित केल्याने विद्यापीठाचेही खासगीकरण होणार का? अशी चर्चा शिक्षण वर्तुळात रंगताना दिसत आहे.