आजच पत्रव्यवहार करून पालिकेकडून एनओसी मिळवा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची विद्यापीठाला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 12:58 PM2022-03-02T12:58:13+5:302022-03-02T13:01:21+5:30
ऑक्सफर्ड विद्यापीठाप्रमाणे मुंबई विद्यापीठाला दर्जा देण्याचा प्रयत्न केला जाईल
मुंबई - विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या आणि विद्यापीठातील इतर इमारतींच्या बांधकामाबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय समंत यांनी विद्यापीठ अधिकारी, पालिका अधिकाऱ्यांसोबत कालिना संकुलात आढावा बैठक घेतली. या बैठकीदरम्यान काही महत्त्वाचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
उदय सामंत यांनी दिले महत्वाचे निर्देश -
- नव्या ग्रंथालयाची इमारत तयार असूनही ना हरकत प्रमाणपत्रासाठी कोणताही पत्र व्यवहार झाला नव्हता. मात्र आता विद्यापीठ प्रशासनाने आजच्या आज हा पत्रव्यवहार करावा त्यानंतर या इमारतीला एनओसी मिळेल.
- नवे ग्रंथालय, परीक्षा भवन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीगृह, मुलींचे वसतिगृह या चार इमारती पुढच्या पंधरा दिवसांत कुठल्याही परिस्थितीत तयार व्हायला हव्यात असे निर्देश विद्यापीठ प्रशासनाला दिले.
-येत्या पंधरा दिवसात जुन्या ग्रंथालयातील पुस्तके नव्या ग्रंथालय इमारतीत स्थलांतरित केली जाणार.
- त्यानंतर त्याचे उद्घाटन राज्याचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येईल.
-विद्यापीठ संकुलात एमएमआरडीएकडून केल्या जाणाऱ्या कामांचा आराखडा एक महिन्यात पूर्ण होईल, त्यानंतर विविध प्रकारच्या इमारती या शैक्षणिक संकुलात उभ्या राहतील आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाप्रमाणे मुंबई विद्यापीठाला दर्जा देण्याचा प्रयत्न केला जाईल.
- पुस्तकांच्या डिजिटलायझेशनसाठी एक ८० ते ९० कोटी रुपयांचा स्कॅनर मुंबई विद्यापीठाकडे आहे, मात्र तो मनुष्यबळाअभावी धूळ खात पडला आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचे ज्ञान असणाऱ्याना पाचारण करून लवकरात लवकर ते कार्यान्वित करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.