लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रवास हा वैयक्तिक वाढीसाठी उत्तम मार्ग आहे. जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा आपल्या कम्फर्ट झोनमधून एक वेगळ्या वातावरणाकडे जातो, जो आपल्याला जबाबदार बनवतो आणि स्वातंत्र्याची भावना देतो, असे गार्गी भुसारी यांनी सांगितले.
मुलुंड येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाद्वारे नुकताच संवाद मंच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गार्गी भुसारी बोलत होत्या. त्यांनी चादर-लेह लडाख ट्रेकच्या रोमांचक अनुभवाबद्दल कथन केले. गार्गी या चादर ट्रेकला २०२१ च्या जानेवारी महिन्यात मित्रांसोबत गेल्या होत्या. त्या मुंबईमध्ये फॅशन डिझायनर असून फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देतात.
गार्गी म्हणाल्या, चादरच्या ट्रेकची तयारी ३ महिने अगाेदर सुरू केली. कोणत्याही ट्रेकसाठी मानसिक आणि शारीरिक तयारी महत्त्वाची असते. शारीरिक तयारी म्हणजे ट्रेककरिता शरीर आणि आरोग्य उत्तम पाहिजे. त्यासाठी दररोज श्वासाचा व्यायाम करणे, लांब अंतर चालण्याचा सराव करणे, आपल्या स्नायूंना सुदृढ बनवणे, भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त ट्रेकसाठी काही गोष्टी म्हणजे ट्रेकिंग शूज, हिवाळ्यातील कपडे, ट्रेकिंग पोल इत्यादी साहित्याची तयारी करणेही गरजेचे आहे.
गार्गी आणि त्यांचा सोबत असलेल्या मित्रांचा ट्रेक शिंगराकोमा गावामधून खाली उतरून झंस्कार नदीपासून सुरू झाला. परंतु ताे अर्धवट राहिला कारण ज्या गोठलेल्या नदीवरून चालून हा जो ट्रेक करण्यात येतो त्या झंस्कार नदीचे बर्फ वितळून पाणी वाहायला लागले आणि एवढ्या कडाक्याच्या थंडीत गार पाण्यात चालणे धोकादायक असल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. तरीही जेवढा ट्रेक त्यांनी केला तो अविस्मरणीय आणि कधी न विसरू शकणार होता, असे त्यांनी सांगितले. पुन्हा हा ट्रेक करणार असल्याचेही स्पष्ट केले.
चादार ट्रेक किंवा झंस्कार घाट हा हिवाळ्यातील एक मार्ग आहे; जो भारताच्या केंद्रशासित प्रदेश लडाखमधील झंस्कार नदी जी हिवाळ्यात संपूर्णपणे गोठून जाते, त्यावर आहे. ट्रेकचे एकूण अंतर अंदाजे १०५ किलोमीटर असून ट्रेकर्स सरासरी ५५ किलोमीटर पर्यंतचा ट्रेक करतात. चादरच्या ट्रेकिंगची सुरुवात चिलिंगपासून होते. पुढच्या काही दिवसांत ट्रेक नेरकपर्यंत (११ हजार १५० फूट) उंच शिबिरांकडे जातो. नेरक हा गोठलेला धबधबा आहे आणि ट्रेकचा परतीचा बिंदूही आहे. चादर ट्रेक करण्याचा उत्तम काळ म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारीचा काळ; जेव्हा हिवाळ्यातील तापमान कधीकधी - ३० ते - ३५ अंशावर येते. चादर ट्रेक सुरू करण्याच्या आधी आर्मी मेडिकल टेस्ट होते आणि जर ट्रेकसाठी योग्य असाल तरच त्यांच्याकडून फिट फॉर चादर ट्रेकचे प्रमाणपत्र मिळते.
......................