CoronaVirus News: घराबाहेर पडा, पण त्रिसूत्री पाळा; टास्क फोर्सचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 02:32 AM2020-09-08T02:32:58+5:302020-09-08T06:52:23+5:30
वाढती रुग्णसंख्या कोरोनाची दुसरी लाट नव्हे
मुंबई : ऑगस्टअखेरपर्यंत नियंत्रणात आलेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. परंतु, राज्यासह मुंबईत अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या वाढत आहे. परिणामी, जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचण्यात यंत्रणांना यश येत आहे. त्यामुळे कोणीही घाबरून न जाता मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असा सल्ला टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी दिला.
सप्टेंबरच्या पहिल्या सहा दिवसांत राज्यात तब्बल १ लाखाहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली, तर मुंबईत या कालावधीत १० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. मात्र, रुग्णसंख्येतील ही वाढ कोरोनाच्या चाचण्या वाढविल्याने दिसून येत आहे. त्याचप्रमाणे काही अंशी वाढत्या रुग्णांमागे अनलॉक हेदेखील कारण आहे, अशी माहिती कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे विश्लेषण करणे आणि त्याचे प्रमाण कमी करण्याकरिता नेमलेल्या मुंबईच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.
डॉ. सुपे म्हणाले, राज्यासह मुंबईत ही कोरोनाची दुसरी लाट नाही. त्यामुळे सामान्यांनी घाबरून जाऊ नये. आपला जो काही व्यवसाय, नोकरी, दिनक्रम असेल तो करताना काळजी घ्यावी. अतिजोखमीचे आजार असलेल्यांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. अनावश्यक बाहेर जाऊ नये. कोरोना प्रादुर्भावापासून वाचण्यासाठीच्या त्रिसूत्री पद्धतीचा वापर केलाच पाहिजे.
रोगप्रतिकारशक्ती महत्त्वाची : प्रत्येकाने रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवली पाहिजे. योग्य आहार, पुरेशी झोप, योग्य व्यायाम गरजेचा आहे. सिझनल इन्फेक्शन जसे, डेंग्यू व मलेरिया या सर्वांवर मात करायची असेल तर प्रतिकारशक्ती चांगलीच पाहिजे, असे डॉ. सुपे म्हणाले.