मुखमंत्री : वांद्रे-कुर्ला संकुलात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविडवरील लस येणार, लसीकरण सुरू हाेणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती. अखेर लसीकरणाचा ऐतिहासिक दिवस आज उजाडला. मात्र, अद्याप कोरोनाचे संकट टळलेले नाही. सर्वांना लस मिळेपर्यंत काही दिवस, महिने लागणार आहेत. आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे. त्यासाठी सज्ज व्हा, कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले.
कोरोनावरील लसीकरण मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड लसीकरण केंद्रापासून केला. या कार्यक्रमाला पर्यटन व मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार झीशान सिद्दिकी, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित आदी उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंंत्री म्हणाले की, रुग्णालयात जागा कमी पडू लागल्यानंतर युद्धकालीन परिस्थितीत आपण १५ दिवसांत हे केंद्र उभारले. त्यानंतर मुंबईत व राज्यभरात अशी केंद्रे उभारली आहेत. आज हे केंद्र ओस पडले आहे, ते असेच राहो, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
आजही ते दिवस आठवले तर अंगावर काटा येतो. दिवसरात्र तणाव होता, जगभरात सगळीकडे अशीच स्थिती होती. पालिका, सरकारी, खासगी रुग्णालये एप्रिल ते जुलैपर्यंत पावसाने नव्हे तर कोरोना रुग्णांनी वाहत होती. आपले पालनकर्ते पालिका आयुक्त, डॉक्टर, परिचारिका यांनी त्याही परिस्थितीत लाखो लोकांचे प्राण वाचवले. त्यामुळे या कोरोना योद्ध्यांना माझा मानाचा मुजरा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोरोना योद्ध्यांच्या कामाचा गौरव केला. केंद्राच्या आरोग्य विभागाने चाचणी करून खात्री पटल्यानंतरच लसीचे सर्वत्र वितरण केले आहे. त्यामुळे लसीबाबत संशय घेण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
* लस मोफत देणे केंद्राच्या निर्णयावर अवलंबून
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रथम कोरोना योद्ध्यांना मोफत लस देण्यात येत आहे. अन्यथा मी देखील लस घेतली असती. केंद्र सरकार मोफत लसीबाबत काय निर्णय घेणार, हे समोर आले की, राज्य सरकार आपला निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
* लस वाटपावरुन राजकारण नको
महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत पश्चिम बंगालला कोरोना लसीचा अधिक साठा देण्यात आला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री या नात्याने राज्याचे सर्व नागरिक मला सारखेच आहेत. तसेच, देशातील सर्व नागरिक हे पंतप्रधानांना सारखेच आहेत अथवा असावेत. त्यामुळे कोरोना लस कोणाला कमी, कोणाला जास्त दिली, याबाबत राजकारण नको, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
* लवकरच लसींचा साठा वाढेल
आणखी दोन - तीन कंपन्या लसीची चाचणी करत आहेत. त्यामुळे लवकरच लसींचा साठा वाढेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
...........................