उच्चशिक्षण क्षेत्रातील जागतिक स्पर्धेसाठी सज्ज व्हा - राज्यपाल सी. विद्यासागर राव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:37 AM2018-07-01T01:37:14+5:302018-07-01T01:37:31+5:30
उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विकसित देशांशी स्पर्धा करण्यासाठी आपल्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांनी संशोधन आणि विविध क्षेत्रांत नावीन्यपूर्ण शोधकार्य करण्याची गरज आहे. आपल्या शिक्षण संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी हातभार लावावा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.
मुंबई : उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विकसित देशांशी स्पर्धा करण्यासाठी आपल्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांनी संशोधन आणि विविध क्षेत्रांत नावीन्यपूर्ण शोधकार्य करण्याची गरज आहे. आपल्या शिक्षण संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी हातभार लावावा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.
साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटी (एसआयइएस), सायन (पश्चिम)च्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यात आला. याबाबतचे प्रमाणपत्र राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्याबाबतचा समारंभ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. याच प्रसंगी महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रा. रामनाथन ग्रंथालयाचे, तसेच प्रयोगशाळांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.
गेल्या ५८ वर्षांत संस्थेच्या महाविद्यालयाने राज्याच्या, तसेच सामाजिक-आर्थिक प्रगतीमध्ये भर घालणाऱ्या अनेक क्षेत्रांत नामवंत नेतृत्त्व तयार केले. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांची यादी प्रभावी आहे. राज्याचा राज्यपाल या नात्याने इतर महाविद्यालयांनी या महाविद्यालयाचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही राज्यपालांनी केले.
उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात पहिल्या दोनशे विद्यापीठे व संस्थांमध्ये बहुतांश विकसित देशांमधील संस्था, विद्यापीठांचा समावेश आहे.
जगातील नामांकित विद्यापीठे आणि संस्था देशातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आकर्षित करत
आहेत. यामुळे आपली उत्कृष्ट बुद्धिमत्ता असलेले युवक इतर
देशांच्या विकासात भर घालत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी येथील विद्यापीठे आणि संस्थांनी जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा पुरविणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, संस्थांकडून केल्या जाणाºया शैक्षणिक कामगिरीचे मूल्यमापन, संस्थांना मार्गदर्शन, शिक्षकांचे प्रशिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आदींवर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
भारत सरकारच्या विज्ञान
आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत दिल्या जाणाºया फंड फॉर इम्प्रूव्हमेंट आॅफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चरमधून एसआयइएस महाविद्यालयाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाला या वर्षात ९५ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. स्वायत्ततेमुळे उत्कृष्टतेचे व कौशल्याचे मान्यता पत्र मिळाले असले, तरी त्याबरोबरच आता विद्यार्थ्यांच्या वाढीव अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी महाविद्यालयावर असल्याची प्रतिक्रिया संस्थेच्या अध्यक्षांनी व्यक्त केली.
सुधारणा करण्याची क्षमता
देशाच्या पंतप्रधानांनी उच्चशिक्षण क्षेत्रासाठी १० हजार कोटी रुपये आणि देशातील सार्वजनिक, तसेच खासगी अशा एकूण २० विद्यापीठांना स्वायत्तता देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय भारतीय उच्चशिक्षण आयोग (एचइसीआय) स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. या दोन निर्णयांमध्ये भारतातील उच्चशिक्षणात जबरदस्त सुधारणा करण्याची क्षमता आहे.