मुंबई - भीम आर्मी या सामाजिक संघटनेचे प्रमुख अॅड. चंद्रशेखर आझाद हे चैत्यभूमी येथे जात असताना त्यांना करण्यात आलेली अटक अत्यंत चुकीची असून त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर यांनी केली आहे. येत्या 1 जानेवारीच्या भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येणारी खबरदारी आणि उपाययोजनांना आमचा विरोध नाही. खबरदारी म्हणून पोलिसांकडून होणाऱ्या उपाययोजना योग्य असून भीम आर्मीच्या प्रमुखांना अटक करण्याची कृती चुकीची व निषेधार्हच असल्याची रिपब्लिकन पक्षाची भूमिका पक्ष प्रवक्ते अविनाश महातेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे.
सामाजिक, विद्रोही कार्यकर्ते कॉ. सुबोध मोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांना भेटण्यासाठी गेले असता अटक करण्यात आली. तसेच भीम आर्मीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मालाड, दादर, शिवाजी पार्क, घाटकोपर, समतानगर, दिंडोशी अशा विविध पोलिस ठाण्यांकडून ताब्यात घेतले जात आहे. वरळीतील जांबोरी मैदानावर सभेचे आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतल्याची माहिती भीम आर्मीचे पदाधिकारी राजू झणके यांनी दिली.
परिणामी सायंकाळी वरळीतील जांबोरी मैदानावर होणाऱ्या सभेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांचा वापर सरकार दडपशाहीसाठी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मालाड वरळीला समर्थन देण्यासाठी पोहोचणाऱ्या कार्यकर्त्यांनाही पोलीस ताब्यात घेत आहेत. तर मुंबईतील पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थानबद्ध केले जात आहे. ही अघोषित आणीबाणी असून एक प्रकारे भाजपा सरकार हुकूमशाही राबवत असल्याचा आरोप झणके यांनी केला आहे. तरी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या मार्फत आंदोलनाची पुढील दिशा लवकरच स्पष्ट केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
मनाली हाॅटेल स्टेशन परिसर व आसपासच्या परिसरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त मानसी हाॅटेल जवळून भीम आर्मी मुंबई प्रमूख सुनीलभाऊ गायकवाड, मराठवाडा विभाग प्रमुख बलराजजी दाभाडे, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख अॅड सचिन पट्टेबहादूर, अॅड अखिल शाक्य, प्रवीण बनसोडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनाली हाॅटेल येथून पोलिसांनी अटक केली आहे.
कोण आहे चंद्रशेखर आझाद?
तीन वर्षांपूर्वी अॅड. चंद्रशेखर आझाद यांनी भीम आर्मीची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक कामे केली आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील जातीय हिंसाचाराच्या घटनेमुळे तेथील योगी सरकारने त्यांच्यावर रासुका कायद्यानुसार कारवाई केली. सलग 16 महिने कारागृहात असलेल्या चंद्रशेखर आझाद यांची रासुका कायद्यातून दीड महिनाभरापूर्वी सहारनपुर कारागृहातून मुक्तता झाली. मात्र आझाद हे कारागृहात असतानाच आता देशातील दलित बहुजनांचा आक्रमक नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह देशभरातील तरुण या संघटनेकडे आकृष्ट झाला आणि भीम आर्मी मागील दीड वर्षात देशभरात वाढली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर भाजपाला सत्तेतून बाहेर करण्याची घोषणा आझाद यांनी केली होती.
1 जानेवारी 1818 मधील लढा
इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालीयनने मोठी कामगिरी बजावली होती. 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला हाेता. यंदा या लढाईला 201 वर्षे पूर्ण हाेणार आहेत. भीमा कोरेगाव येथे या लढाईत हुतात्मा झालेल्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. दरवर्षी लाखो आंबेडकरी जनता या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असते. 2018 वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.