Join us

‘या’ खड्ड्यांतून होईना सुटका! गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मुंबईत खड्ड्यांचे प्रमाण जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 1:53 PM

गेल्या दोन वर्षांतील खड्ड्यांपेक्षा यावर्षी रस्त्यांवर जास्त खड्डे असल्याचे महापालिकेच्याच आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रस्त्यांवर खड्डे वारंवार का पडतात, मुंबई उच्च न्यायालयाच्या या प्रश्नावर शुक्रवारी महानगरपालिका आयुक्तांकडे काहीही उत्तर नसल्याचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत दिसून आले. मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची आकडेवारी पाहिली असता या प्रश्नाचे उत्तर वेगळ्या अर्थाने मिळत आहे. गेल्या दोन वर्षांतील खड्ड्यांपेक्षा यावर्षी रस्त्यांवर जास्त खड्डे असल्याचे महापालिकेच्याच आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. 

यावर्षीच्या पावसाळ्यात मुंबईत ५९,५३३ खड्डे आढळून आले आहेत. २०२१ मध्ये हीच संख्या ४३,४७८ आणि २०२२ मध्ये ३८,३१० होती, असे महानगरपालिकेची आकडेवारी सांगते. 

पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची पुरती वाताहत झाली असून त्यामुळे अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर वाहतूककोंडी देखील होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या खड्ड्यांवरून पालिका प्रशासनाचे कान टोचत असताना चांगले आणि गुळगुळीत रस्ते देणे हे पालिकेचे कर्तव्य असल्याची आठवण करून दिली आहे. दुसरीकडे खड्ड्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. 

देशाच्या आर्थिक राजधानीत दर पावसाळ्यात खड्डे पडणे हे नवल राहिलेले नाही. यंदा हे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने १२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पालिकेने यंदा रिएक्टिव्ह अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या तंत्रज्ञानात केमिकल व डांबराचा वापर केला जातो. रिएक्टिव्ह अस्फाल्ट वाहनांच्या चाकाला सहसा चिकटत नाही. तसेच खड्डा बुजवल्यानंतर पुढील १५ मिनिटांतच ते सुकते, त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक सुरू करता येणे शक्य होते. हे नवे तंत्रज्ञान वापरूनही रस्त्यावरील खड्डे १०० टक्के बुजण्याबाबत साशंकता व्यक्त केली.

खड्डे का पडतात?

मुंबईतील बहुतेक रस्ते हे डांबराचे (अस्फाल्ट) असून त्यातील बिटूमन आणि पाण्याचा संयोग झाल्यामुळे खड्डे पडतात. बिटूमनचा पाण्याशी संपर्क झाल्याने प्रक्रिया होऊन ते विलग होते व खड्डा तयार होतो. वेळीच दुरुस्ती न केल्यास तो वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकतो. 

९९२ किलोमीटरचे काँक्रिटचे रस्ते

मुंबई महानगरात सुमारे २०५० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. पैकी १ हजार ५८ किलोमीटर डांबरी, तर ९९२ किलोमीटरचे काँक्रिट रस्ते आहेत. डांबराच्या रस्त्यावर खड्डे पडतात खड्ड्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी पालिकेने सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे.

 

टॅग्स :खड्डेमुंबई