‘गो ग्रीन’द्वारे मिळवा वीजबिलात १२० रुपये सूट; महावितरणची ग्राहकांना नववर्ष भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 15:04 IST2025-01-01T15:04:06+5:302025-01-01T15:04:54+5:30
‘गो ग्रीन’च्या ग्राहकांना महिन्याला छापील बिलाऐवजी ई-मेलद्वारे वीजबिल पाठविण्यात येते. तीन कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्याप चार लाख ६२ हजार (१.१५ टक्के) जणांनी ‘गो ग्रीन’चा पर्याय निवडला आहे.

‘गो ग्रीन’द्वारे मिळवा वीजबिलात १२० रुपये सूट; महावितरणची ग्राहकांना नववर्ष भेट
मुंबई : नववर्षाची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर आता वीजबिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे. ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. यापूर्वी या योजनेंतर्गत वीजबिलात १० रुपये सूट देण्यात येत होती. मात्र, आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यांसाठीचे १२० रुपये तत्काळ एकरकमी सवलत मिळणार आहे.
‘गो ग्रीन’च्या ग्राहकांना महिन्याला छापील बिलाऐवजी ई-मेलद्वारे वीजबिल पाठविण्यात येते. तीन कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्याप चार लाख ६२ हजार (१.१५ टक्के) जणांनी ‘गो ग्रीन’चा पर्याय निवडला आहे.
...नंतर दरमहा सूट
- सर्व नोंदणीकृत वीजग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात येणार आहे. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीजबिलात सूट देण्यात येणार आहे.
- त्यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ई-मेलवर वीजबिल पाठविण्यात येणार असून, त्यापुढे दरमहा वीजबिलात १० रुपये सूट देण्यात येणार आहे.