मुंबई : लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया करायची म्हटले तर डोळ्यासमोर येते ते खासगी रुग्णालय आणि त्यासाठी होणारा खर्च. महागड्या उपचारांमुळे ही शस्त्रक्रिया करण्यासाठी धजावत नाही. लठ्ठपणामुळे रुग्णांना हृदयविकार, मधुमेह अशा विविध व्याधींना सामोरे जावे लागते. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी चार ते पाच लाख रुपये खर्च येतो. मात्र, शासकीय जे. जे. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया दीड ते दोन लाखांत होते.
जे. जे. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया गेली दहा वर्षे सुरू आहे. मात्र, अनेकवेळा इतर शस्त्रक्रिया करण्याचा ताण असल्यामुळे सरकारी रुग्णालयात सहसा लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष होते. आतापर्यंत ४०० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात वरळी येथील शमीम बानू या ५१ वर्षांच्या महिलेवर जे. जे. रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. तिचे वजन १०७ किलो होते, त्यामुळे त्यांना दैनंदिन काम करण्यात अडथळा निर्माण होत होता. चालताना दम लागत होता. या शस्त्रक्रियेसाठी बॉडी मास इंडेक्सचे (बीएमआय- शरीराचे वजन आणि उंची यांचे गुणोत्तर) प्रमाण बघून निर्णय घेतला जातो. ३२ पेक्षा अधिक बीएमआय असणाऱ्या व्यक्तींचा या शस्त्रक्रियेसाठी विचार केला जातो.
जो खर्च येतो त्यातून या उपचारपद्धतीत काही गोष्टी वापरल्या जातात. त्या बाहेरुन आणाव्या लागतात. शमीम बानू या महिलेवर गॅस्ट्रिक बायपास ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये जठराचा आकार सुमारे ३० मिलिमीटर इतका लहान केला जातो.- डॉ. अमोल वाघ, सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्सा विभाग
निरोगी आरोग्यासाठी शस्त्रक्रियापूर्वी एक गैरसमज होता की, ही शस्त्रक्रिया सुंदर दिसण्यासाठी करतात. मात्र, ही शस्त्रक्रिया निरोगी जीवनासाठी वरदान आहे. ज्यावेळी रुग्ण व्यायाम करून आणि इतर प्रयत्नानेसुद्धा वजन कमी करीत नाहीत. त्यांचे वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढून त्यांना अन्य व्याधींना सामोरे जावे लागते. त्यावेळी अशा पात्र रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. -डॉ. अजय भंडारवार शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख, जे. जे. रुग्णालय.
बानू यांनी सांगितले की, मला डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सुचविले होते. त्यामध्ये जे. जे. रुग्णालय हा चांगला पर्याय वाटल्याने मी येथे ही शस्त्रक्रिया केली. मला माझ्या दोन लहान मुलांच्या संगोपनासाठी आरोग्यदायी जीवन हवे आहे. मला या रुग्णालयाच्या सेवेचा चांगला अनुभव आला.