Join us

स्वयंचलित दरवाजांना तंत्रज्ञान मिळेना

By admin | Published: February 08, 2016 4:12 AM

लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित दरवाजा असलेल्या लोकल चालविण्याचा निर्णय पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून घेण्यात आला.

मुंबई : लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित दरवाजा असलेल्या लोकल चालविण्याचा निर्णय पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून घेण्यात आला. मात्र हा प्रयोग यशस्वी न झाल्याने आणि अपघात होईल या भीतीने अनेक कंपन्यांनी मुंबईतील लोकलच्या या प्रयोगासाठी तंत्रज्ञान देण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-बोरीवली लोकलच्या फर्स्ट क्लासच्या एका महिला डब्यात स्वयंचलित असणारे दरवाजे मेसर्स फेव्हली या कंपनीकडून बसविण्यात आले होते. महालक्ष्मीच्या कारखान्यात हे काम करण्यात आले होते. मात्र काही दिवसांनंतर या यंत्रणेत अडथळे येण्यास सुरुवात झाली आणि हा प्रयोग बंद करण्यात आला. दिल्ली मेट्रोचा अभ्यास करून ही यंत्रणा बसविण्यात आली होती. मेट्रोच्या दरवाजाचे वजन शंभर किलो असताना पश्चिम रेल्वेने सिमेन्स लोकलला केवळ ५२ किलोचा दरवाजा बसवून प्रयोग केला. परंतु तो सपशेल अपयशी ठरला. सध्याच्या लोकलमधील गरम हवा फेकणारे ९0 टक्के ब्लोअर्स बंद पडलेले आहेत. त्यामुळे स्वयंचलित दरवाजा प्रवासातच बंद झाल्यास अशावेळी प्रवासी गुदमरतील, अशी भीती तंत्रज्ञान परविणाऱ्या कंपन्याना आहे. पश्चिम रेल्वेवर केलेल्या प्रयोगात स्वयंचलित दरवाजाचे नियंत्रण हे गार्डच्या हातात देण्यात आले होते. मात्र ते हाताळताना बरीच कसरत करावी लागत होती.