रेल्वेत राहिलेली वस्तू अशी मिळवा; तत्काळ रेल्वे पोलिसांत तक्रार करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 02:05 PM2023-10-31T14:05:09+5:302023-10-31T14:05:18+5:30
विसरलेल्या वस्तूचे काय होते? ती कशी मिळू शकते? जाणून घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रेल्वे प्रवास करताना एखादी वस्तू किंवा बॅग रेल्वेत चुकून राहून गेली तर बऱ्याचदा आपण ती वस्तू सोडून देतो परंतु रेल्वेत राहिलेलं एखाद सामान किंवा बॅग परत मिळवण्यासाठी सर्वांत आधी रेल्वे पोलिसांत तक्रार करावी.
तसे केल्यास कदाचित तुम्हाला तुमची वस्तू तातडीने किंवा लवकर मिळते. रेल्वे प्रवास करताना तुम्ही ज्या रेल्वेस्टेशनवर उतरला आहात त्याच रेल्वेस्टेशनवर ‘आरपीएफ’कडे आपले सामान गाडीत राहिल्याची तक्रार करावी. याबाबत तुम्ही ‘एफआरआय’देखील दाखल करू शकता. रेल्वे पोलिस ठाण्यात जमा तक्रारीनंतर तुमची वस्तू तुम्हाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे ही रेल्वे पोलिसांची जबाबदारी असते.
विसरलेल्या वस्तूचे काय होते?
तुम्ही जर रेल्वे गाडीत सामान विसरलात तर ते सामान रेल्वे कर्मचारी स्टेशन मास्टरकडे सुपूर्द करतात. त्या सामानात जर सोन्याचे दागिने असतील तर ते दागिने २४ तासांसाठी स्टेशन मास्टरच्या कार्यालयातच ठेवले जातात. या चोवीस तासांत कुणी व्यक्ती त्या वस्तूवर क्लेम करते तर ते सामान त्या व्यक्तीला दिलं जातं. ते सामान पुढच्या झोनल ऑफिसला पाठविण्यात येते. तर, दुसऱ्या सामानासाठी तीन महिन्यांचा कालावधी असतो
अशी मिळवा आपली वस्तू
बऱ्याचदा रेल्वे पोलिस तक्रार केलेल्या पोलिस ठाण्यातही ती वस्तू घेऊन येतात. तक्रारदार आपले कागदपत्रे दाखवून ते मिळवू शकतात. विशेष म्हणजे काही ठिकाणी तक्रारदाराच्या घरापर्यंत ते सामान पोहोचवण्याची सुविधा केली जाते.