दहा मिनिटांत गाठा भाईंदर, दहिसर-भाईंदर एलिव्हेटेड मार्गाने सुटणार वाहतूककोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 10:58 AM2023-07-26T10:58:10+5:302023-07-26T10:58:21+5:30
दहिसर चेकनाका येथे नित्याचीच होणारी वाहतूककोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे.
मुंबई : दहिसर चेकनाका येथे नित्याचीच होणारी वाहतूककोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. मुंबईत येण्यासाठी पर्याय म्हणून महापालिका दहिसर-भाईंदर एलिव्हेटेड मार्ग उभारत आहे. सर्वात कमी किमतीची बोली लावत या प्रकल्पाची निविदा एल अँड टी कंपनीने जिंकली असून ४ वर्षात हा प्रकल्प बांधून पूर्ण करावा लागणार आहे.
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेकनाका येथून मुंबईत येताना किंवा ठाणे, विरार, गुजरातला जाताना पश्चिम द्रुतगती मार्ग हा एकच पर्याय आहे. त्यामुळे दहिसर चेकनाक्यावर वाहनांची अहोरात्र गर्दी असते. परिणामी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. यावर पर्याय म्हणून दहिसर ते भाईंदरपर्यंत नवीन पाच किमीचा एलिव्हेटेड मार्ग बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. सध्या दहिसर ते भाईंदरपर्यंतच्या प्रवासाला वाहनचालकांना किमान पाऊणतास लागतो. मात्र या एलिव्हेटेड मार्गामुळे हे अंतर अवघ्या दहा मिनिटात कापता येईल. या प्रकल्पासाठी ३ हजार कोटी खर्च करण्यात येईल. ऑक्टोबर २०२२ मध्ये यासाठी निविदा काढण्यात आली होती. या प्रकल्पासाठी एल अँड टी कंपनीने सर्वात कमी किमतीची बोली लावली आहे. मुंबई किनारी रस्त्याचा अंतिम टप्पा असलेला हा उन्नत मार्ग ४ वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांनी दिली.
तीन कंपन्या उत्सुक
महापालिकेने या प्रकल्पासाठी १ हजार ९९८ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चासाठी निविदा प्रक्रिया राबवली.
त्यामध्ये लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट आणि ॲफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या तीन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या त्यापैकी एल अँड टी कंपनीने सर्वात कमी किमतीची १,९८१ कोटी रुपये बोली लावली.
त्यामुळे आता या प्रकल्पाचे काम लार्सन अँड टुब्रो कंपनीला देण्यात येणार आहे.
या आहेत अटी
दहिसर-भाईंदर जोडरस्त्यासाठीचे बांधकाम हे कमाल ४२ महिन्यात करणे अपेक्षित आहे. तसेच, प्रकल्प परवानग्यांसाठी सहा महिने अतिरिक्त अंदाजित कालावधीचाही समावेश आहे.
सदर प्रकल्पाअंतर्गत पालिका हद्दीत १.५ किमीचा उन्नत मार्ग आणि मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत ३.५ किमी उन्नत मार्गाचा समावेश असेल. या संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी पालिकेकडून करण्यात येईल.
तर मीरा-भाईंदर हद्दीतील प्रकल्पासाठीच्या खर्चाचा परतावा हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई महापालिकेला देण्यात येणार आहे.
दहिसर खाडी भागात या प्रकल्पाच्या निमित्ताने स्टीलचा सुमारे १०० मीटर अंतराचा पूल तयार करण्यात येईल. एकूण ५ किमी उन्नत मार्गांसाठी एकूण ३३० खांबांचा आधार असणार आहे.
प्रत्येक ३० मीटर अंतरावर हे खांब असतील. संपूर्ण रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा तयार करण्यात येणार आहे.
दहिसर-भाईंदर जोडरस्त्याचा वापर प्रति दिन एकूण ७५ हजार वाहने करतील. या प्रकल्पाअंतर्गत २ आंतरबदल मार्गिका असतील.
त्यात दहिसर आणि भाईंदर अशा दोन्ही बाजूंसाठी आंतरबदल मार्गिका असेल. तर पाच किलोमीटरच्या अंतरासाठी आठ मार्गिकांचा समावेश आहे, अशी माहिती उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली.