Join us

लस घ्या, कर्करोगाचा धोका टाळा; गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 6:23 AM

जानेवारी महिना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या आजाराचा जनजागृती महिना म्हणून देशभर साजरा केला जातो.  

मुंबई : भारतात स्तनाच्या कर्करोगानंतर आता सर्वांत मोठ्या प्रमाणात होणारा कर्करोग म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. अनेक वेळा महिलांना या आजाराची लक्षणे कळत नाही. मात्र, लस घेऊन त्याचा प्रतिबंध करता येतो. त्यामुळे १६ वयापुढील मुली-महिलांनी ही लस घेऊन वेळेत या आजाराचा प्रतिबंध केला पाहिजे, असे मत स्त्रीरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जानेवारी महिना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या आजाराचा जनजागृती महिना म्हणून देशभर साजरा केला जातो.  

दरवर्षी ३० हजार महिलांचा मृत्यू 

भारतात दरवर्षी सर्वसाधारणपणे सव्वा लाखापेक्षा अधिक महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो, तर ३० हजारांपेक्षा अधिक महिलांचा मृत्यू या आजाराने होतो. विशेष म्हणजे काही महिलांमध्ये या आजाराचे निदानही होत नाही. त्यामुळे स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. 

४०० रुपयांपर्यंत लस

काही महिन्यांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूटने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) स्वतःची लस विकसित केली आहे. विशेष म्हणजे स्वस्त दरात ही लस उपलब्ध करून दिली आहे. सध्या या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी उपलब्ध असलेल्या दोन लसींच्या किमती हजारोंच्या घरात आहेत.त्यामुळे सर्वसामान्यांना लस घेणे परवडत नव्हते. भारतात विकसित केलेल्या लसीची किंमत २०० ते ४०० रुपयांच्या घरात असणार आहे.

अनेक वेळा लक्षणे दिसल्यावर महिला त्या अंगावर काढतात. कारण त्यावेळी त्यांना फारसा त्रास जाणवत नाही. असे न करता महिलांनी योग्यवेळी तपासणी करून घ्यावी. पॅप स्मीअर चाचणीवरून या आजाराचे निदान करणे शक्य आहे. विशेष म्हणजे हा एकमेव कर्करोग लसीने प्रतिबंधित केला जातो. - डॉ. नंदिता पालशेतकर, लीलावती रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ

या आजाराबाबत शाळा- महाविद्यालयांतून जागृती केली पाहिजे. १६ ते १८ वयोगटात जर ही लस दिली, तर त्याची परिणामकारकता जास्त असते. कारण आमच्याकडे अनेकवेळा रुग्ण येतो त्यावेळी ती महिला गरोदर असते किंवा गर्भधारणा होत नसते, त्यावेळी त्या येतात. अनेकवेळा रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत आहे, या तक्रारी घेऊन येतात. योग्य वेळी लस घेतल्याने या आजाराचा ७५ टक्के प्रतिबंध करता येतो.  - डॉ. निखिल दातार, वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ

टॅग्स :कर्करोगडॉक्टर