मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृती फडणवीस यांनीही विरोधक म्हणून आपली भूमिका बजावायला सुरुवात केली आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन शिवसेनेवर टीका केली. आरेतील वृक्षतोडीला शिवसेनेने विरोध केला होता. त्यामुळे, ठाकरे सरकार येताच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. त्यावरुनच, अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला प्रश्न विचारला आहे. औरंगाबादेत बाळासाहेबांच्या स्मारकासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरुन अमृता यांनी शिवसेनेला ढोंगी असं म्हटलंय.
औरंगाबाद येथे दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होत आहे. त्यासाठी, शिवसेना 1 हजार झाडं तोडणार आहे. त्यावरुन Get Well Soon शिवसेना असे म्हणत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केलीय. हे फक्त कमिशनसाठी सुरू आहे. शिवसेनेचा ढोंगीपणा यातून समोर येतो असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच थेट टीका करत शिवसेनेला टार्गेट केलं आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पत्नी म्हणून अमृता यांनीही आपली भूमिका बजावायला सुरुवात केल्याचं दिसून येतंय.देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 28 वे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मी पुन्हा येईन... असे विधान केल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाने अजित पवारांशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. पण, 80 तासांतच देवेंद्रांचे सरकार कोसळले. त्यानंतर, महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर, पहिल्यांदाच अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर थेट टीका केली.
दरम्यान, यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊँटवरुन एक शायरी व्यक्त केली. शायरीतून आपला मत मांडताना पलट के आऊंगी, मौसम जरा बदलने दे... असे म्हणत मी पुन्हा येणार असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच, महाराष्ट्रानं मला गेल्या 5 वर्षे वहिनी म्हणून जे प्रेम दिलं, त्याबद्दल महाराष्ट्राचे आभार. मी गेली 5 वर्षे माझी भूमिका माझ्या क्षमतेनुसार बेस्ट निभावलीय, असे त्यांनी म्हटलं होतं.