Get well Soon Sonuda... प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 09:48 IST2020-10-16T09:47:37+5:302020-10-16T09:48:27+5:30
बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या दिलवाले या चित्रपटात प्ले बॅक सिंगिंगचं काम कुमार सानू यांनी केलं होतं. त्यातील सर्वच गाणी हीट झाली होती.

Get well Soon Sonuda... प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण
मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाली आहे. सानूचे मॅनेजर जगदीश भारद्वाज यांनी कुमार सानू यांना कोरोना झाल्याची अधिकृत माहिती दिली. बॉलिवूड जगतातील प्ले बॅक सिंगर म्हणून कुमार यांचं मोठं नाव आहे. दर्दभरे गाणे आणि कुमार सानू असं एक समीकरण बॉलिवूडमध्ये बनलंय. त्यामुळे, कुमार सानू यांचा चाहता वर्गही मोठा आहे.
बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या दिलवाले या चित्रपटात प्ले बॅक सिंगिंगचं काम कुमार सानू यांनी केलं होतं. त्यातील सर्वच गाणी हीट झाली होती. तेव्हापासून दर्दभरा गायक असं सानू यांना संबोधलं जात. कुमार सानू हे गुरुवारी सकाळी दुबईमार्गे अमेरिकेतील लॉस एँजेलिसला जाणार होते. मात्र, हवाई यात्रा करण्यापूर्वी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे, सानूदा यांचा कोरोना दौरा रद्द करण्यात आला आहे. तर, बीएमसीकडून सानू यांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कुमार सानू यांची पत्नी सलोनी आणि त्यांच्या दोन्ही मुली सना व एना या लॉस एँजिलिस शहरात राहात आहेत. त्यामुळे, दर महिन्याला त्यांना भेटण्यासाठी सानूदा अमेरिकेला जातात. मात्र, कोरोना महामारीमुळे गेल्या 9 महिन्यांपासून ते अमेरिकेला गेले नव्हते. आता, हवाई वाहतूक सुरू झाल्यामुळे ते अमेरिका दौऱ्यावर निघाले असताना, कोरोना पॉझिटीव्ह असल्याने त्यांना होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. सानूदा यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर ट्विटर कुमार सानू नावाने ट्रेंड सुरु झाला असून Get well Soon सानूदा असं म्हणत चाहत्यांना त्यांच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे.