आधी तुमच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून घ्या
By admin | Published: August 20, 2014 11:41 PM2014-08-20T23:41:52+5:302014-08-21T00:28:30+5:30
संजय पाटील : मणेराजुरी येथील सभेत जोरदार टीका
मणेराजुरी : आमच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यापेक्षा आधी तुमच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करा. पराभव समोर दिसत असल्याने तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलताना आपली राजकीय उंची केवढी याचा विचार करा. आपण कुणाबद्दल बोलतो याचे भान ठेवा, असा उपरोधिक टोला खासदार संजय पाटील यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना लगावला. मणेराजुरी (ता. तासगाव) येथे सभेत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून दिले. माझा सत्कार केला, मी तुमचा ऋणी आहे. समाजकारण, राजकारण हे लोकांसाठी वापरायचे आहे. विरोधक मात्र याचा वापर स्वत:साठी करत आहेत. गृहमंत्री आर. आर. पाटील माझ्याविरोधात प्रचार करत होते व प्रतीक पाटील यांना मतदान करा, असे आवाहन करीत होते. त्यांनी जर प्रतीक पाटील यांचा प्रचार केला नसता, तर माझे मताधिक्य घटले असते. त्यांच्याबद्दल मतदार संघात प्रचंड नाराजी असून, या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून द्यायची आहे. आर. आर. पाटील यांनी लोकसभेच्यावेळी माझे आव्हान स्वीकारले नाही. मी निवडून आलो तर गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा व मी हरलो तर राजकारण सोडतो, असे आव्हान दिले होते, ते त्यांनी स्वीकारले नाही.
अजितराव घोरपडे म्हणाले, सावळजच्या यात्रेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी माझ्यावर टीका केली की, बंद फोनवरून अधिकाऱ्यांना पाणी सोडण्यास धमक्या दिल्या जात आहेत. बंद फोनवरून बोलण्याची नवी टेक्नॉलॉजी सांगलीत कशी आली? बंद फोनवरून मला बोलावे लागत नाही. आमचा फोन आला तर कामच व्हायला पाहिजे, अशी आमची भूमिका असते. आवाजात ताकद पाहिजे. येऱ्यागबाळ्याचे काम नाही.
अजून निवडणुका लांब आहेत. तोपर्यंत प्रचाराची पातळी खाली आणू नका. आमचे कार्यकर्ते रस्त्यावर आले, तर पळायला जागा शिल्लक राहणार नाही, असा इशारा त्यांनी आर. आर. पाटील यांचे नाव न घेता दिला. तासगाव—कवठेमहांकाळ विधानसभेची जागा कुणाची, सेनेला जाणार की भाजपला जाणार, याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ते दोन्ही पक्ष बघून घेतील.
यावेळी खासदार संजय पाटील यांचा नागरी सत्कार मणेराजुरी भाजपच्यावतीने करण्यात आला. प्रभाकर तोडकर, शशिकांत जमदाडे, दिनकर झांबरे, स्वप्निल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. माजी सरपंच सचिन जमदाडे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.
मकरंद देशपांडे, धनपाल खोत, शिवाजी पाटील, रावसाहेब पाटील, विलास जमदाडे, विजय एकुंडे, तुकाराम बेडगे, संभाजी पवार, बाळासाहेब कुमठेकर, सुनील माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)