टॅटू काढताय? काळजी घ्या! एकाच सुईच्या वापरामुळे एचआयव्हीला निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 01:47 PM2023-06-06T13:47:23+5:302023-06-06T13:48:02+5:30

गेल्या काही वर्षांत शरीराच्या विविध भागांवर गोंदवून घेण्याची फॅशन निघाली आहे.

getting a tattoo be careful inviting hiv through single needle use | टॅटू काढताय? काळजी घ्या! एकाच सुईच्या वापरामुळे एचआयव्हीला निमंत्रण

टॅटू काढताय? काळजी घ्या! एकाच सुईच्या वापरामुळे एचआयव्हीला निमंत्रण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या काही वर्षांत शरीराच्या विविध भागांवर गोंदवून घेण्याची फॅशन निघाली आहे. विशेषकरून तरुणाईमध्ये हे टॅटू काढून घेण्याचे फॅड अधिकच वाढले आहे. या टॅटू काढून घेण्यामध्ये तरुणाई आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव, काही पालक आपल्या मुलांची नावे, तर काही जण चित्रविचित्र टॅटू हातावर काढून घेण्यासाठी सरसावलेली आढळून येतात. 

कॉलेजमध्ये तर सध्या टॅटू काढून घेण्याची फॅशनच आहे. मानेवर हातावर, पायावर कानाच्या बाजूला हे टॅटू काढले जातात. हे टॅटू काढताना अनेक वेळा वापरली जाणारी सुई एकाचवेळी अनेक जणांवर काढण्यासाठी वापरली जाते. विशेष म्हणजे टॅटू काढताना ती त्वचेच्या आत जाऊन त्याचा रक्ताशी संबंध येऊ शकतो. त्यामुळे ती एकाच सुई अनेक लोकांमध्ये वापरल्याने एचआयव्हीसारख्या आजाराला निमंत्रण दिले जाऊ शकते. या अशा घटना यापूर्वी घडल्याने टॅटू काढताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ करतात.

टॅटू काढणे अंगाशी येऊ शकते

टॅटू काढणे म्हणजे केवळ गोंदविले जात नाही, तर ते आकर्षक दिसावेत म्हणून ते पिअर्सिंग केले जाते. आपल्याला वाटते केवळ टॅटू म्हणजे हिरव्या रंगाचाच असेल. हल्ली अनेक रासायनिक रंगाचा वापर करून टॅटू काढले जातात. त्यात निऑन रंगाचा वापर करून लाल, निळा रंगांचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे त्वचेला बाधा पोहोचण्याची शक्यता अधिक असते. कारण या रंगांतील घातक विषारी द्रव्यांमुळे शरीराला हानी पोहोचू शकते. त्यामुळे शरीरावर टॅटू काढणे अंगाशी येऊ शकते. त्यामुळे जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

काय काळजी घ्याल?

- टॅटू काढणाऱ्याला सुई बदलण्यास सांगावे.
- मुख्य म्हणजे टॅटू काढणाऱ्या प्रोफेशनल पार्लरमध्येच जावे. त्याठिकाणी दर्जाबाबत हलगर्जीपणा होत नाही. 
- त्वचेला रंगाची ऍलर्जी असेल तर टॅटू काढू नये.
- टॅटू काढणारी व्यक्ती प्रशिक्षित आहे का, याची खातरजमा करून घ्या.
- टॅटू काढल्यानंतर आरोग्याची समस्या उद्भवल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. उगाच दुखणे अंगावर काढू नये.

टॅटू काढण्यासाठी वापरली जाणारी सुई हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. एकाच सुईचा वापर अनेक ग्राहकांसाठी होत असेल, तर त्यामुळे केवळ एचआयव्हीचेच संक्रमण होत नाही, तर हिपेटायटिस सी आणि हिपेटायटिस बी हे आजार होऊ शकतात. अशा पद्धतीच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. काही ठिकणी पैसे वाचविण्याच्या नादात टॅटूवाले सुई बदलत नसतील, तर ग्राहकांनी त्यावर आक्षेप घेतला पाहिजे. गेल्या पाच सहा महिन्यांत टॅटूमुळे एचआयव्ही झाल्याच्या घटना उघडकीस आल्या नाहीत, तसेच शरीराच्या ज्या भागावर हा टॅटू काढल्यानंतर त्या भागाच्या आजूबाजूला काही वेळाने सूज येऊ शकते.  -डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्जेस रुग्णालय

 

Web Title: getting a tattoo be careful inviting hiv through single needle use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य