मुंबई : विवाह संकेतस्थळावरून मेहुणीसाठी निवडलेल्या वराने लग्नापूर्वीच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली साडेआठ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. अंधेरी परिसरात राहणाऱ्या ४८ वर्षीय तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार, २०२१ पासून ते त्यांच्या ३५ वर्षीय मेहुणीसाठी मुलाच्या शोधात होते.
जीवनसाथी या संकेतस्थळावर त्यांनी नावनोंदणी केली. जावेद खान नावाच्या व्यक्तीने त्यांना रिक्वेस्ट पाठवली. तो ठाणे येथील शासकीय कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्याचे सांगितले. दोघांमध्ये भेटीगाठी झाल्या. त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र, गेल्यावर्षी नातेवाईक वारल्याने त्यांनी लग्नाची बोलणी पुढे ढकलली. याच, दरम्यान फेब्रुवारी २०२२ मध्ये मुलीचा नीटचा निकाल लागला. तिला विलेपार्लेच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
ठरल्याप्रमाणे त्याला टप्याटप्प्याने साडे आठ लाख रुपये पाठवले. मात्र, प्रवेश न मिळाल्याने त्यांना संशय आला. त्यांनी अधिक चौकशीत जावेदने फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यांनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावताच त्याने काही धनादेश त्यांना सोपवले. तेदेखील बाउन्स झाले. त्यानंतर, तो नॉट रिचेबल झाला. अखेर, यात फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.