मुंबई : लोकल प्रवासाच्या वेळी केलेली स्टंटबाजी २०वर्षीय महाविद्यालयीन तरुणाच्या जिवावर बेतली आहे. गोरेगाव रेल्वे स्थानकाहून मालाड येथील महाविद्यालयात जाताना फलाटावरील प्रवाशाला टपली मारण्याच्या प्रयत्नात, प्रवीण धुर्वे याचा खांबाला धडकून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.प्रवीण मालाडमधील निर्मल महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शुक्रवारी नेहमीप्रमाणे गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वरून मालाडच्या दिशेकडे जाणारी लोकल त्याने पकडली. लोकलमध्ये दरवाजाजवळ उभ्या असणाऱ्या प्रवीणने फलाटावरील एका प्रवाशाला टपली मारण्याचा प्रयत्न केला, परंतु या वेळी लोकलने वेग पकडला. ती लोकल फलाटाच्या टोकावर येईपर्यंत प्रवाशाला टपली मारणाऱ्या प्रवीणला त्याचा अंदाज आला नाही आणि काही क्षणांतच लोकल फलाटाहून निघेपर्यंत तो तेथील खांबावर आदळला. या धडकेनंतर प्रवीण लोकलमधून खाली कोसळला. प्रवीण फलाटावर कोसळताच, याची माहिती तत्काळ रेल्वे पोलिसांना देण्यात आली. प्रवीणला शताब्दी रुग्णालयात दाखलही करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)स्टंटबाजी नेहमी धोकादायकधावत्या लोकलमधून फलाटावर पाय ठेवण्याचा प्रयत्न करणे, लोकलबरोबर पळणे, लोकलमधून उड्या मारणे आणि पुन्हा आत शिरणे, असे धोकादायक प्रकार मुले करताना दिसून येतात. अनेकदा धावत्या लोकलमधून बाहेरील खांबांना हात लावण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे, टपावरून ओव्हरहेड वायरचा स्पर्श झाल्याने अनेकांना प्राण गमवावा लागला आहे.
लोकलमधून टपली मारणे बेतले जिवावर
By admin | Published: February 28, 2016 2:11 AM