Join us

ऑनलाईन मदत घेणे डाॅक्टरांना पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:07 AM

ठगाच्या जाळ्यात अडकले; खात्यातील ५६ हजारावर डल्लालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चॅनेलवरील प्रोग्राम प्रक्षेपित होत नसल्याने गुगलचा आधार ...

ठगाच्या जाळ्यात अडकले; खात्यातील ५६ हजारावर डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चॅनेलवरील प्रोग्राम प्रक्षेपित होत नसल्याने गुगलचा आधार घेणे डॉक्टरला महागात पडले. गुगलवरील ठगांनी त्यांना एक ॲप डाऊनलोड करायला सांगून त्यांच्या खात्यातील रकमेवर ऑनलाईन डल्ला मारला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून मलबार हिल पोलीस तपास करीत आहेत.

मलबार हिल परिसरात ७४ वर्षीय डॉक्टर राहण्यास आहेत. त्यांनी दीड महिन्यापूर्वी एका चॅनलचे ३९ रुपयाचे एक वर्षाचे सबस्क्रीप्शन घेतले होते. ४ जूनच्या सकाळपासून या चॅनेलवरील प्रोग्राम प्रक्षेपित होत नसल्याने त्यांनी गुगलवर या चॅनलच्या वेबसाईटचा ग्राहक सेवा क्रमांक शोधला. संबंधित क्रमांकावर कॉल करताच, समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने कस्टमर केअरमधून विनय बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रोग्राम पुन्हा दिसतील, अशी बतावणी करत डाॅक्टरांना ॲप डाऊनलोड करायला भाग पाडले. त्यातील अर्जात बँक खात्याची आणि डेबिट कार्डची सर्व माहिती आणि पिनकोड घेतला.

डाॅक्टरांनी माहिती भरून सबमिट बटणवर क्लिक करताच त्यांना मोबाईलवर ४ ओटीपी आले. ठगाने हे ओटीपी घेऊन सर्व प्रोग्राम सुरू होतील, असे सांगून फोन ठेवून दिला. त्यानंतर डाॅक्टरांच्या खात्यातून ५५ हजार ९९८ रुपये गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

...................................................