‘युटीएस’ ॲपवरून लोकल तिकीट काढणे आणखी सोपे
By सचिन लुंगसे | Published: May 9, 2024 07:01 PM2024-05-09T19:01:33+5:302024-05-09T19:02:39+5:30
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत भर पडत आहे.
मुंबई : लोकलच्या तिकिटासाठी प्रवाशांना रांगेत उभे राहू लागू नये, प्रवासाचा वेळ वाचावा, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने ‘युटीएस’ मोबाइल ॲपची सेवा सुरू केली होती. मात्र, आता या ॲपवरून तिकीट काढण्यासाठीच्या हद्दीची मर्यादा काढण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही ठिकाणांवरून लोकलचे तिकीट काढता येत आहे. मात्र, ते काढल्यानंतर त्या तिकिटावर पहिल्या तासाभरात प्रवास करणे बंधनकारक आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत भर पडत असून, टेक्नोसॅव्ही प्रवाशांची संख्या मोठी आहे. विशेषत: तरुण, नोकरदार या ॲपचा अधिक वापर करत आहेत. त्यामुळे ॲपवरून काढल्या जाणाऱ्या तिकिटांची संख्या वाढत असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. तर, मध्य रेल्वेच्या प्रवाशांकडूनही या ॲपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हद्दीची मर्यादा आता काढण्यात आली असून, घरबसल्या किंवा जेथे कुठे प्रवासी असेल तेथून त्याला ॲपवर लोकलचे तिकीट काढता येत आहे. तिकीट काढल्यानंतर मात्र पहिल्या तासाभरात प्रवासाला सुरुवात करणे गरजेचे आहे.
‘डिजिट इंडिया’ला प्रोत्साहन
- डिजिटल इंडिया उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
- तिकीट काढण्याची ही पद्धत रेल्वे प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे.
- कॉन्टॅक्टलेस तिकीट, कॅशलेस व्यवहार आणि तिकीट बुक करताना ग्राहकांची सोय या गोष्टींना अधिक महत्त्व दिले जात आहे.
- ‘यूटीएस’ ऑन मोबाइल ॲप वापरण्याचा एक अतिरिक्त फायदा म्हणजे प्रवाशांना ‘आर-वॉलेट’ रिचार्जवर तीन टक्के बोनस मिळत आहे.