नवीन परवाना मिळण्यास वेळ लागणार, तांत्रिक अडचणीमुळे होणार विलंब
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 05:43 AM2019-11-14T05:43:42+5:302019-11-14T05:44:11+5:30
या परवान्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे नवीन वाहन परवाना मिळण्यास विलंब होणार आहे.
मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार नवीन चालक परवाना ऑक्टोबर २०१९ मध्ये आणला जाणार होता. त्यामुळे वाहन चालविण्याच्या परवान्यासह इतर गैरप्रकारांना आळा बसेल, वाहनचालकाची वैयक्तिक माहितीही सुरक्षित होईल, असे सांगण्यात येत होते. परंतु या परवान्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे नवीन वाहन परवाना मिळण्यास विलंब होणार आहे.
या नवीन परवान्यामध्ये सुरक्षिततेसाठी चिप आणि क्यूआर कोडची व्यवस्था देतानाच त्यात चालकाची माहिती साठवून ठेवण्याचे नियोजनही करण्यात आले. यात चालकाचा आपत्कालीन संपर्क क्रमांकही असेल. याशिवाय लायसन्सच्या मागील बाजूस वाहनांच्या वर्गीकरणाची माहिती लघुस्वरूपात देतानाच त्याची अंतिम मुदतही असेल. या परवान्याच्या रंगसंगतीतही बदल केले जातील. परंतु नवीन परवान्यासाठी सॉफ्टवेअर बनविण्याचे काम केंद्र सरकारच्या नॅशनल इन्फरेमेटिक सेंटरकडे आहे. सॉफ्टवेअरमध्ये येणाऱ्या काही तांत्रिक अडचणींमुळे त्याला विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार आॅक्टोबर २०१९ पासून वाहनचालकांना नवीन स्वरूपातील परवाना मिळणार होता. परंतु या परवान्यासाठी सॉफ्टवेअर बनविण्याचे काम हे केंद्राच्या नॅशनल इन्फरेमेटिक सेंटरकडे असून त्यावर अद्याप काम सुरू आहे. त्याला किती वेळ लागेल हे निश्चित सांगता येणार नाही, परंतु चालकांना लवकरच नवीन परवाना मिळेल, असे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी सांगितले.