Join us

गटारावरील झाकण काढणे म्हणजे गुन्हा, महापालिकेची कोर्टात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 6:30 AM

पालिकेची उच्च न्यायालयाला माहिती : ८३९ गटारांवर बसवल्या संरक्षक जाळ्या

मुंबई : गटारावरचे (मॅनहोल) झाकण उघडल्यास तो गुन्हा ठरेल, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. तसेच महापालिकेने मुंबईतील ८३९ गटारांवर संरक्षक जाळ्या बसवल्याची माहितीही उच्च न्यायालयाला या वेळी दिली. गेल्या वर्षी पावसाळ्यात उघड्या गटारामध्ये पडून बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाल्याने महापालिकेला टीकेचे धनी व्हावे लागले होते.

मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी ८३९ गटारे आहेत. या सर्व गटारांवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी उच्च न्यायालयाला दिली. कोणत्याही कारणासाठी गटारे उघडी केलीत, तर त्या ठिकाणी सूचना फलक लावा, अशी सूचना न्यायालयाने महापालिकेला केली. ‘उघड्या गटारांजवळ लाल झेंडा किंवा सूचना फलक लावा. पावसाळ्यापूर्वी गटारांच्या देखभालीचे व दुरुस्तीचे काम पूर्ण करत जा. त्याशिवाय उघड्या गटारांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा,’ अशी सूचनाही न्यायालयाने महापालिकेला केली. त्यावर महापालिकेने गटारावरील झाकणे काढणे म्हणजे गुन्हा ठरेल, असे न्यायालयाला सांगितले. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू उघड्या गटारामध्ये पडून झाल्याने फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. महापालिकेला सर्व उघडी गटारे संरक्षक जाळ्यांनी बंद करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला केली आहे.च्मुंबईत पाणी साचणाºया ठिकाणी ८३९ गटारे आहेत. या सर्व गटारांवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत, अशी माहिती ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी दिली.

टॅग्स :मुंबईउच्च न्यायालय