घागर उताणी रे... गोपाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 12:57 AM2017-08-16T00:57:14+5:302017-08-16T00:57:22+5:30
यंदा स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर आलेल्या दहीहंडीमुळे गोविंदांच्या उत्साहाला उधाण आले होते.
मुंबई : यंदा स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर आलेल्या दहीहंडीमुळे गोविंदांच्या उत्साहाला उधाण आले होते. स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी आणि उच्च न्यायालयाने उंचीचे निर्बंध उठवल्याने मोठ्या संख्येने गोविंदा रस्त्यावर उतरले होते. मात्र आयोजकांनी हंडीची उंची वाढवत पारितोषिकांच्या रकमेत आखडता हात घेतला होता.
आयोजकांनी गतवर्षीच्या तुलनेत थरांप्रमाणे मिळणाºया रकमेत कपात केल्याने गोविंदा पथकांमधून रोष व्यक्त करण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे गतवर्षी चार आणि पाच थरांसाठी देण्यात येणारी रक्कम यंदा ६ व ७ थर रचणाºया गोविंदा पथकांना देण्यात येत होती. याउलट शहरात मोजक्याच ठिकाणी आयोजित दहीहंडी उत्सवांत ४ व ५ थरांसाठी मानधनच ठेवले नसल्याने छोट्या गोविंदा पथकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
हंडीच्या उंचीवरील निर्बंध उठवल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगली गर्दी झाली असली, तरी मुंबईतील मोकळे रस्ते गोविंदांना लागलेल्या ओहोटीची साक्ष देत होते. लाखोंची बक्षिसे असलेल्या ठिकाणी मोठ्या गोविंदा पथकांनी गर्दी केली होती. याउलट छोट्या आयोजकांकडे मोठ्या पथकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दुपारपर्यंत पाहायला मिळाले. तर उंचीवरील निर्बंध उठले असले, तरी उत्सव महत्त्वाचा असून गोविंदांच्या जिवाचा खेळ नको, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत काही आयोजकांनी मर्यादित थर लावण्यास परवानगी दिली. उपनगरातील बरीच पथके दुपारनंतर शहरातील हंड्यांकडे कूच करताना दिसली. पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गालगत लागलेल्या दुचाकी आणि चारचाकी गोविंदांच्या उत्साहाची साक्ष देत होत्या.
व्यसनमुक्तीसह प्लास्टिकमुक्तीचा संदेश
मागाठणे विधानसभा क्षेत्र व तारामती चॅरिटेबल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने येथील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी बोरीवली(पूर्व)देवीपाडा येथील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या मैदानात दहीकाला महोत्सवाचे आयोजन केले होते. महोत्सवातून त्यांनी गुटखा,
तंबाखू व्यसनमुक्तीचा आणि प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश दिला. दहीकाला महोत्सव हे फक्त मनोरंजन नसून मनोरंजन आणि प्रबोधनाची सांगड घालण्याचा प्रयत्न आहे, असे सुर्वे यांनी सांगितले.
महोत्सवाला मुंबई, ठाणे
येथील सुमारे ५५० ते ६०० दहीकाला पथकांनी सलामी दिली. त्यांना प्रोत्साहनपर
आर्थिक बक्षीस देण्यात आले होते. या वेळी सिनेतारका नेहा धुपिया, निधी चंद्रा, कायनाथ अरोरा, श्रुती मराठे, तेजा देवकर, भार्गवी चिरमुले, सुकन्या काळन यांनी नृत्यकला सादर केली. अभिनेता स्वप्निल जोशी याच्यासह दिग्दर्शक गणेश आचार्य या वेळी उपस्थित होते. शिवाय उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, मिलिंद नार्वेकर, शिवसेना
उपनेते विनोद घोसाळकर
उपस्थित होते.
>बक्षिसांच्या रकमेत घट!
मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, टिळकनगर, शिवाजीनगर, कुर्ला भागात लागणाºया लाखोंच्या दहीहंड्या यंदा दिसल्याच नाहीत. त्यात चेंबूर परिसरात मात्र काही प्रमाणात मोठ्या हंड्या लागल्या होत्या. मात्र तेथीलही हंड्यांसाठी लावलेल्या रकमेत घट झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. चेंबूरच्या घाटला गावात, चेंबूर नाका येथे पाच ते सहा थर लागतील अशा हंड्या बांधण्यात आल्या होत्या. परंतु बक्षीस रकमेबाबत आयोजकांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मानखुर्दमधील शिवसह्याद्री प्रतिष्ठानने चेंबूर, मानखुर्दसह नवी मुंबईत अनेक ठिकाणी सहा थर लावले. चेंबूर येथील मनसेच्या कर्णबाळा दुनबळे यांच्या दहीहंडीची चर्चा होती.
>कारवाई जोरात, गोविंदा कोमात
गतवर्षीपासून पोलिसांनी दुचाकीस्वार गोविंदांवर सुरू केलेली विनाहेल्मेट आणि ट्रिपल सीटची कारवाई यंदाही जोरात सुरू होती. शहरासह उपनगरांत मोठ्या संख्येने वाहतूक पोलीस आणि मुंबई पोलिसांनी गोविंदांवर कारवाईचा बडगा उगारला.
>बेंजोच्या तालावर गोविंदा बेफाम
लाउडस्पीकर व्यावसायिकांनी पुकारलेल्या संपाचा फटका मुंबईतील आयोजकांना बसला. मात्र त्याचा तितकासा परिणाम गोविंदांच्या उत्साहावर झाला नाही. कारण आयोजकांनी डीजेला पर्याय म्हणून बेंजो वादकांना संधी दिली होती. परिणामी, बेंजोच्या तालावर बेफाम होऊन नाचणाºया गोविंदांनी संपाची हवाच काढली.
>पश्चिम उपनगरातील ‘शोर’ सुनासुना!
मुंबापुरीत दहीहंडीचा शोर झाला असला, तरी पश्चिम उपनगरातील दहिसर ते वांद्रेदरम्यान दहीहंडीचा उत्साह काहीसा ओसरल्याचे दिसले. न्यायालयाच्या निर्बंधामुळे येथील बहुतेक आयोजकांनी हंड्यांकडे पाठ फिरवली होती. लाउडस्पीकर संपामुळे पश्चिम उपनगरातील गोविंदा पथकांमधील उत्साह कमी झाल्याचे दिसले. महत्त्वाच्या चौकांमध्ये छोट्या प्रमाणात दहीहंडी उभारण्यात आल्या होत्या. त्यात आयोजकांनी न्यायालयाने घातलेल्या नियमांचे पालन करणे पसंत केले. मुख्य मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. दहीहंडी पथकातील तरुण दुचाकीवरून विनाहेल्मेट आणि ट्रिपल सिट प्रवास करताना निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात होती.
>आयोजनात भाजपासह मनसेची आघाडी
आतापर्यंत शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असलेल्या आयोजनात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसने काढता पाय घेतला होता. याउलट शिवसेनेच्या तुलनेत मनसे आणि भाजपाने दहीहंडी आयोजनात आघाडी घेतल्याचे चित्र होते.
>फाइव्ह गार्डनला गोविंदांचा विळखा
उपनगरातून मोठ्या संख्येने शहरातील हंड्यांच्या शोधात आलेले हजारो गोविंदा माटुंगा येथील फाइव्ह गार्डन परिसरात विसावले होते. पुलाव, पावभाजी, वडापाव अशा नानाविध जिन्नसांवर ताव मारत गोविंदांनी क्षणभर विश्रांती घेतली. त्यामुळे जणूकाही गोविंदांनी उद्यानाला विळखाच घातल्याचे चित्र निर्माण झाले होते.
>सुरक्षा साहित्याला
‘कही हाँ, कही ना’!
मुंबईतील बड्या आयोजकांनी मैदानात हंड्यांचे आयोजन करत सुरक्षा साहित्याला प्राधान्य दिल्याचे दिसले. त्यात काळाचौकीच्या भगतसिंह मैदानापासून चेंबूर नाक्यावरील दहीकाला उत्सवाचा समावेश होता.गोविंदाला सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, आयोजनस्थळी अंथरलेल्या गाद्या, रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती.
>अंधेरीत लाखाची हंडी
अंधेरी पश्चिमेकडील बी. पी. रोड येथे आयोजक सुरेश दांडेकर यांनी मनसे शाखा क्रमांक ६६तर्फे दहीकाल्याचे आयोजन केले होते. या ठिकाणी लावलेल्या १ लाखाच्या पारितोषिकाने गोविंदांचे लक्ष वेधले. गोविंदा पथकांना थरांची मर्यादा नव्हती.