Join us

ईडीच्या धाडीनंतर महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 4:17 AM

\Sईडीच्या धाडीनंतर महाविकास आघाडी, भाजपमध्ये घमासानसूड, साधुसंत, मर्दानगीपासून उखाळ्यापाखाळ्यांना ऊतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेना आमदार प्रताप ...

\Sईडीच्या धाडीनंतर महाविकास आघाडी, भाजपमध्ये घमासान

सूड, साधुसंत, मर्दानगीपासून उखाळ्यापाखाळ्यांना ऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने सोमवारी धाडी टाकत चौकशीला सुरुवात करताच राज्यातील राजकीय वातावरण तापले. केंद्र सरकार आणि भाजपकडून सूडबुद्धीने कारवाई सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. तर, काही चुकीचे केले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही इथपासून सरनाईक काही साधुसंत नाहीत, असे प्रत्युत्तर भाजपच्या गोटातून देण्यात आले.

प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईचे वृत्त समजताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढविला. आम्ही कोणाला शरण जाणार नाही, लढत राहू. सुरुवात त्यांनी केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहीत आहे. सरनाईक घरात नसताना त्यांच्या घरात धाड टाकली, ही नामर्दानगी आहे. भाजपने सरळ लढावे, शिखंडीसारखे ईडी, सीबीआयला पुढे करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. यावर, सरनाईक घरी नव्हते म्हणून राऊत आरोप करत आहेत. मग, कंगना रनौतच्या कार्यालयावर बुलडोझर चालविला तेव्हा ती घरात होती का, असा सवाल करतानाच एक महिला घरी नसताना, नोटीस न देता केलेल्या कारवाईत मर्दानगी होती का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांनी मर्दानगी वगैरे म्हणत आव्हान-प्रतिआव्हानाची भाषा करू नये. त्यांच्याकडे शंभर नेत्यांची यादी असेल तर ती त्यांनी जाहीर करावी. त्यांना कोणी अडवले आहे, असे दरेकर म्हणाले.

तर, सहा वर्षांत एका तरी भाजप नेत्यावर ईडी, सीबीआयची कारवाई झाली का, विरोधी पक्षाचे सरकार असते तिथेच कारवाई का, असा प्रश्न करतानाच प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई ही महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

तर, ड्रग्जवाल्यांवर कारवाई केली की यांना त्रास होतो. हवाला आणि काळापैसाप्रकरणी कारवाई केली तरी खालीवर होतात, या ठाकरे सरकारचा काय प्राॅब्लेम आहे, असा उपरोधिक टोला मुंबई भाजपचे प्रभारी, आमदार अतुल भातखळकर यांनी केला. काही काळेबेरे नसेल तर इतका थयथयाट कशाला, असे विचारतानाच ठाण्यात लागलेल्या आगीच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचतील ही भीती असावी काय, पण चिंता कशाला? कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही, असे भातखळकर म्हणाले. अर्णव गोस्वामी विरोधातील कारवाईदरम्यान शिवसेना नेत्यांनी कायद्यापेक्षा कोणी मोठा नसल्याची भूमिका वारंवार बोलून दाखविली होती.