पनवेल : पनवेल, खारघर व कामोठे या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या घरफोडींच्या घटनांमधून चोरटयांनी लाखो रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.पनवेल तालुक्यातील काळुंद्रे येथील रहिवासी वासुदेव झुमारे यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरटयांनी आतील सोन्याचे दागिने व सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा लाखो रूपयांचा ऐवज चोरून नेला, तर खारघर सेक्टर-१२ येथील कृष्णा पॅराडाईझ या इमारतीत घरफोडीची घटना घडली. या ठिकाणचे रहिवासी अरूणा सिंग यांच्या बंद घराच्या सेफ्टी दरवाजाचे ग्रील चोरटयाने तोडून घरातील कपाटात असलेली दीड लाख रूपयांची रोकड चोरून नेली. तर कामोठयातील घटनेत खांदा गावातील रहिवासी दिलीप तुकाराम पाटील यांच्या घराची खिडकी उघडी असल्याची संधी साधून चोरटयांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सहा लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेची नोंद कामोठे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अशा प्रकारे गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरातील घरफोडयांमध्ये चांगलीच वाढ झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)
पनवेलमध्ये घरफोड्यांचे सत्र
By admin | Published: June 23, 2014 2:41 AM