पालिकेतील मराठी शाळा संपविण्याचा घाट ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:10 AM2021-09-09T04:10:23+5:302021-09-09T04:10:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एकीकडे महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळा पटसंख्येअभावी बंद पडत असताना दुसरीकडे महापालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :
एकीकडे महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळा पटसंख्येअभावी बंद पडत असताना दुसरीकडे महापालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई आणि आता केंब्रिज मंडळाच्या शाळांचा धडाका पालिका शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात येत आहे. महानगरपालिकेचा पैसा मातृभाषेतील शिक्षण देणाऱ्या शाळा दर्जेदार होण्यासाठी खर्च होणे अपेक्षित असताना केवळ मराठी भाषा पर्याय म्हणून देऊन मराठी शाळांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप मराठी भाषा प्रेमी संघटनांकडून आणि संस्थाचालकांकडून केला जात आहे.
नुकताच आंतरराष्ट्रीय मंडळाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि केंब्रिज विद्यापीठाच्या दरम्यान, करार झाला आहे. मात्र, त्यावर मराठी भाषा प्रेमी संघटना आणि संस्थाचालकांकडून प्रचंड टीका होत असून, पालिकेच्या या धोरणाला तीव्र विरोध होत आहे.
२०१९ च्या प्रजा संस्थेमार्फत करण्यात आलेल्या पालिका शाळांच्या सर्वेक्षणानुसार मागील दहा वर्षांत मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या तब्ब्ल १११ शाळा बंद पडल्या असल्याचे धक्कादायक वास्तव प्रजा फाउंडेशनच्या वार्षिक अहवालातून समोर आले आहे. मराठी अनिवार्यचा शासन निर्णय आला, पण इतर मंडळांच्या शाळांत त्याची अंमलबजावणी कागदावरच असताना थेट इतर मंडळाच्या शाळाच सुरू करण्याचा घाट घालणे म्हणजे मराठी भाषा संपविण्याचा घाट घालण्यासारखे असल्याचे मत मराठी भाषा प्रेमी व्यक्त करीत आहेत.
मातृभाषेतून शिक्षण हा शिक्षणाचा सर्वोत्तम पर्याय असे जागतिक पातळीवरचे तज्ज्ञ ओरडून सांगत असताना केंब्रिज मंडळातून शिक्षण हा उत्तम पर्याय ठरविण्याचा अधिकार कराराला संमती देणाऱ्यांना कोणी दिला, असा प्रश्न मराठी शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी उपस्थित केला आहे. मराठी शाळांना मरणपंथाला सोडून पालिका शाळांत इतर मंडळाच्या शाळाची सुरुवात करणे म्हणजे मुंबई व महाराष्ट्रातील मराठी शाळा संपविण्यासाठीचे पहिले पाऊल असून, आम्ही या निर्णयाचा निषेध करून हा निर्णय रद्द करण्याचे धाडस सरकारने करावे, अशी विनंती शेजुळे यांनी केली आहे.
पालिका शाळांत सुरू करण्यात आलेल्या इतर मंडळाच्या अभ्यासक्रमात मराठी केवळ एक विषय म्हणून मराठीची बोळवण करून महापालिकेच्या राज्य मंडळाच्या मराठी शाळांवर मोठी संक्रांत आणण्याचा शासनाचा इरादा पक्का असल्याची टीका मराठी शाळा आपण टिकविल्या पाहिजेत, असे मत संस्थापक प्रसाद गोखले यांनी व्यक्त केले. मराठी माध्यमाच्या शाळांना बळकटी आणण्याऐवजी इतर मंडळांना मोठे केले जाण्याचा प्रकार अत्यंत खेदजनक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मराठीचे रक्षकच आता भक्षक होत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.