Join us

मराठी शाळा बंद करण्याचा घाट, पालकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 2:38 AM

मराठीची गळचेपी होत असताना शहरातील आणखी एक मराठी शाळा धोकादायक आणि मोडकळीस आल्याच्या नावाखाली बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्या शाळेतील विद्यार्थी व पालकांनी केला आहे.

मुंबई : मराठीची गळचेपी होत असताना शहरातील आणखी एक मराठीशाळा धोकादायक आणि मोडकळीस आल्याच्या नावाखाली बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्या शाळेतील विद्यार्थी व पालकांनी केला आहे. यामुळे त्या शाळेत शिकणाऱ्या पहिली ते दहावीच्या तब्बल ३५० मुलांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या धामधुमीत या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आता या शाळेचे माजी विद्यार्थी एकवटले असून शाळा बंद न करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

विद्यावर्धिनी संचालित गोरेगाव पश्चिम येथील विद्यामंदिर शाळेतील पालक आणि विद्यार्थ्यांना १२ एप्रिल २०१९ रोजी शाळेची इमारत धोकादायक असून पुनर्विकासाचे काम करायचे असल्याने, इतर शाळेत प्रवेश घेण्यास सांगण्यात आले. मागील ३ वर्षांपासून शाळेने टप्प्याटप्प्याने प्रवेशाच्या संख्येत घट केली आहे. संस्था चालकांच्या या निर्णयामुळे पुढे काय, असा प्रश्न आता पालकांना पडला आहे. याबाबत माजी विद्यार्थ्यांनी संस्थाचालकांशी पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला कोणतीही दाद मिळाली नसल्याची माहिती माजी विद्यार्थी विनीत गुप्ते यांनी दिली. संस्थाचालकांसोबतच्या बैठकीसाठी त्यांनी सदस्य पाठविले, मात्र स्वत: उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे संस्थाचालकांचा यामागचा नेमका हेतू काय, असा प्रश्न पालक आणि माजी विद्यार्थ्यांना पडला असल्याची प्रतिक्रिया गुप्ते यांनी दिली. या संदर्भात माजी विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्री यांनाही निवेदने दिली आहेत, मात्र त्यांना अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

शाळा बंद होऊ न देण्याचा माजी विद्यार्थ्यांचा निर्धारमहापालिका विभागाकडून शाळेची इमारत धोकादायक नसल्याची माहिती माजी विद्यार्थ्यांनी दिली. मात्र ज्या परिसरात ही शाळा आहे तेथील आजूबाजूचा परिसर हा रहिवासी बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जात असून संस्थाचालकांना ही जागा त्यासाठीच वापरायची असल्याचा आरोप काही पालकांकडून होत आहे. यासंदर्भात शाळेचे संस्थाचालक सुधाकर टिल्लू यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. मात्र जवाहरनगर परिसरात मध्यमवर्गीय पालकांसाठी मराठी शाळेचा हा एकच पर्याय असल्याने ही शाळा बंद होऊ न देण्याचा निर्धार माजी विद्यार्थ्यांनी केला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :मराठीशाळा