Join us

घाटकोपर दुर्घटना; आणखी एकाचा मृत्यू एकूण मृतांची संख्या १७ वर : १० रुग्णांवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 10:24 AM

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत जखमी झालेल्या आणखी एका रुग्णाचा केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुंबई :  घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत जखमी झालेल्या आणखी एका रुग्णाचा केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजू सोनावणे असे त्याचे नाव आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या आता १७ झाली आहे. सध्या या दुर्घटनेतील १० रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी आठ रुग्ण राजवाडी रुग्णालयात, तर २ रुग्ण केईएम रुग्णालयात आहेत. 

होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटनेला नऊ दिवस झाले असून, अद्याप काही रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. राजावाडी रुग्णालयात असणाऱ्या दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली असून, दोन रुग्णांना मणक्याचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर उर्वरित चार रुग्णांना अजूनही वेदना होत असल्याने त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. भारती राजुलवाला यांनी सांगितले. 

केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले की, सोनावणे यांची प्रकृती पहिल्या दिवसापासून गंभीर होती. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यांना फुफ्फुसावर गंभीर इजा झाली होती. तर इतर दोन रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :मुंबईघाटकोपर पश्चिमअपघात