घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपीच्या कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:54 AM2018-05-15T05:54:52+5:302018-05-15T05:54:52+5:30
सोळा वर्षांपूर्वी घाटकोपर येथील एका बेस्टच्या बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक केलेल्या इरफान अहमद गुलाम अहमद कुरेशी (४७) याच्या पोलीस कोठडीची मुदत १७ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
मुंबई : सोळा वर्षांपूर्वी घाटकोपर येथील एका बेस्टच्या बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक केलेल्या इरफान अहमद गुलाम अहमद कुरेशी (४७) याच्या पोलीस कोठडीची मुदत १७ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. स्फोटानंतर फरारी झाल्यानंतर दीड वर्षाने तो मस्कतमध्ये पहिल्यांदा पत्नीला भेटला होता, अशी कबुली त्याने दिली आहे.
आॅक्टोबर २००२मध्ये झालेल्या स्फोटातील संशयित असलेला कुरेशी हा परदेशात फरारी झाला होता. तो औरंगाबाद येथे आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गेल्या आठवड्यात त्याला तेथून अटक केली. स्फोटानंतर तो देशातून पलायन करून मस्कतमधील एका तेल कंपनीत काम करीत होता. त्याची पत्नी नाझनीन डॉक्टर असून, औरंगाबाद येथील एका सरकारी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
घटनेच्या दीड वर्षानंतर तिने मस्कतला जाऊन त्याची भेट घेतली. काही दिवस तेथे राहिल्यानंतर ती पुन्हा औरंगाबादला परतली होती. गेल्या सोळा वर्षांत तो कोठे कोठे वास्तव्यास होता, कोणाच्या संपर्कात होता, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंधेरी रेल्वे स्थानकाशेजारी बेस्टच्या बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ४९ लोक जखमी झाले होते. त्यानंतर कुरेशी फरार झाल्याने एटीएस त्याच्या मागावर होते. या प्रकरणातील १९ जणांना अटक
झाली असून, कुरेशीसह ९ जण
फरार होते.